काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सदस्य नोंदणीमुळे हजारो नवीन सदस्य जोडले गेले - पृथ्वीराज चव्हाण


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : जानेवारी महिन्यापासून राज्यात काँग्रेस पक्षाकडून सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपात केली गेली होती. या सदस्य नोंदणीसाठी राज्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यामुळेच मतदारसंघात तसेच राज्यात अनेक नवीन सदस्य जोडले गेले. मतदारसंघात प्रत्येक गावात काँग्रेस कार्यकर्त्यांनी डिजिटल सदस्य नोंदणी राबविली व याला चांगला प्रतिसाद मिळाला असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केले. यावेळी कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, मंगला गलांडे, पंचायत समिती सदस्य नामदेवराव पाटील, उत्तमराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, माजी जि प सदस्य जयवंतराव जगताप, विद्याताई थोरवडे, राजेंद्र चव्हाण, मलकापूरचे नगरसेवक राजेंद्र यादव, नितीन थोरात, शिवाजीराव मोहिते, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, इंद्रजीत चव्हाण, अशोकराव पाटील, कराड दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिग्विजय पाटील आदींसह कराड दक्षिण काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.  

याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, काँग्रेस पक्षाची संघटनात्मक रचना निवडणुकीच्या माध्यमातून व्हावी यासाठी पक्षाच्या निवडक जेष्ठ मंडळींनी सोनिया गांधी यांना विनंती केली त्यानुसार देशभर डिजिटल सदस्य नोंदणी पक्षातर्फे राबविली जात आहे. या अभियानाला देशभर मोठा प्रतिसाद मिळाला असून यापुढे हे सदस्यच काँग्रेस पक्षाचे नवीन पदाधिकारी मतदानाच्या माध्यमातून निवडतील. लोकशाही देशभर रुजावी यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली पाहिजे म्हणूनच हे अभियान देशभर राबविले गेले. लोकशाही जपणारा सर्व धर्म समभाव जपणारा असा हा देशातील एकमेव पक्ष आहे. ज्या पक्षाने समाजाच्या प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सत्ता काळात धोरणात्मक निर्णय घेतले. अश्या या काँग्रेस पक्षाचा विचार देशभर पोहचविण्याची सद्याची गरज आहे. 

यावेळी मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक मांडले व शिवराज मोरे यांनी आभार मानले.