दैनिक "सामना"चे प्रतिनिधी गोरख तावरे यांना "पत्रकार भूषण पुरस्कार" जाहीर

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबई येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने देण्यात येणारा "पत्रकार भूषण पुरस्कार २०२२" साठी कराड येथील दैनिक "सामना"चे प्रतिनिधी गोरख तावरे यांची निवड करण्यात आली आहे.अशी माहिती मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी दिली.

पुरस्कारांचे स्वरूप सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे आहे. पत्रकार गोरख तावरे गेली 34 वर्षे दैनिक "सामना"साठी कराड प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयांवर दैनिक "सामना"मध्ये लेखन करीत आहेत. तसेच साप्ताहिक राजसत्य गेली पंचवीस वर्षे नियमितपणे कराड येथून प्रसिद्ध केले जात आहे. याचे संपादक म्हणून गोरख तावरे आजही काम पाहत आहेत. कराड येथे "पत्रकार भवन" उभारण्यात गोरख तावरे यांचे योगदान आहे. पत्रकारांचे प्रश्न तसेच लघु - मध्यम वृत्तपत्रांचे प्रश्न, संपादकांच्या समस्या शासन स्तरावर सोडविण्यासाठी गोरख तावरे यांनी आत्तापर्यंत काम केलेले आहे. तसेच शासन स्तरावर अनेक प्रश्न मार्गी लावण्यामध्ये गोरख तावरे यांचे योगदान असून सकारात्मक पत्रकारिता करावी. यासाठी गोरख तावरे नेहमीच विविध स्तरावर प्रयत्न करीत असतात.

मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे प्रतिवर्षी समाजाच्या विविध क्षेत्रातील आपल्या योगदानातून समाजजीवन संपन्न करणाच्या नामवंतांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाचा संस्थेचा २१ वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण समारंभ असून संस्थेच्या पुरस्कार निवड समितीची नुकतीच बैठक झाली. गेली अनेक वर्ष पत्रकार क्षेत्रात आपल्या भरीव व आदर्श कार्याची नाममुद्रा पत्रकार गोरख तावरे यांनी निर्माण केली आहे. यांची दखल घेऊन "पत्रकार भूषण पुरस्कार २०२२" साठी निवड समितीने निवड केली आहे.

पुरस्कार वितरण सोहळा ४ जून रोजी सायं. ४ वा. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय डॉ. सुरेंद्र गावसकर सभागृह, दादर, मुंबई येथे होणार आहे. जेष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, सुप्रसिद्ध कवी ए. के. शेख, साहित्यिक डॉ. लक्ष्मण शिवणेकर या प्रमुख अतिथीच्या हस्ते पुरस्कार वितरण प्रदान करण्यात येणार आहे.असेही मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी सांगितले