ज्या महाविद्यालयामुळे आपण घडलो त्या संस्कार केंद्राप्रती माजी विद्यार्थ्याची त्यागाची भावना पाहून आपण भारावून गेलो. प्राचार्य पी.यु.शेठ, एस.के.कुंभार यांच्यासारखे अनेक समर्थ नेतृत्व करणारे गुरुदेव कार्यकर्ते तळमावल्याच्या निसर्गाशी एकरूप झाले. त्यांच्या श्वासातून, कष्टातून, तपश्चर्येतून नागटेकडीचे नंदनवन झाले. चांगला शिक्षक चांगल्या विद्यार्थ्याला जन्म देतो. संगीताच्या लयीत, तालात जो डुलतो तो खऱ्या अर्थाने जीवन जगतो. असे उद्गार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पी.यु.शेठ हे होते. यावेळी व्यासपीठावर डाॅ.बाबुराव गुरव, कौस्तुभ गावडे, आर.के.भोसले, एस.के.कुंभार, आर.व्ही.शेजवळ, प्राचार्य डाॅ.अरुण गाडे, महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य व्ही.जी.सासनुर यांच्या पत्नी श्रीमती सासनुर, मुख्याध्यापक अशोक माने, संघाचे अध्यक्ष राजाभाऊ माने व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्राचार्य अभयकुमार साळुंखे पुढे बोलताना म्हणाले, ‘‘शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि थोर देशभक्त काकासाहेब चव्हाण या द्रष्टया नेतृत्वाने काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले या ज्ञानवृक्षाची स्थापना 1969 रोजी केली. तेव्हापासून असंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या स्वप्नरुपी पंखांना बळ देण्याचे काम या महाविद्यालयाने निष्ठापूर्वक केले आहे. या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले बहुमोल योगदान देत आहेत. याचा संस्थेला सार्थ अभिमान आहे. कॉलेजला माजी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी - विद्यार्थिनींची समृद्ध परंपरा लाभली आहे. येथील गुरुदेवांचे स्थान विद्यार्थ्यांच्या जीवनात ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ व अटळ आहे. याचा प्रत्यय या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला.
यावेळी साहित्य, क्रीडा, शिक्षण, कला, सहकार, शेती आदी क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेल्या मान्यवर माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांना शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये प्राचार्य अभयकुमार साळुंखे, अॅड.जनार्दन बोत्रे, पत्रकार डॉ.संदिप डाकवे, सरपंच रविंद्र माने, प्राचार्य आर.के.भोसले, शंकर ढोणे तथा आनंद विंगकर, अॅड.राम होगले, हंबीरराव देसाई सर, संभाजी साळुंखे, कुसूमताई करपे, सर्जेराव यादव, प्राचार्य पी.यु.शेठ, प्रा.डॉ.बाबुराव गुरव एस.के.कुंभार, कै.प्राचार्य व्ही.बी.सासनुर, पोपटराव देशमुख, प्रा.सी. टी.चिकमठ इ.मान्यवरांचा समावेश होता.
माझ्या सेवेचा काही काळ तळमावले या ठिकाणी गेला आहे. आयुष्यातील दोन पदव्या मी तळमावले येथे असताना घेतल्या. तळमावलेच्या मातीने आम्हाला ऊर्जा दिली असे गौरवोद्गार सुप्रसिध्द विचारवंत डाॅ.यशवंत पाटणे यांनी काढले.
याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत प्रा.बाबुराव गुरव, प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ, संभाजी रामचंद्र साळुंखे, अॅड.राम होगले यांनी मनोगते व्यक्त केली. दरम्यान, या कार्यक्रमाला काॅलेजचे अनेक माजी विद्यार्थी, माजी प्राचार्य, शिक्षक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. या शिक्षकांचा शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुस्तक देवून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पी.यु.शेठ म्हणाले, ‘‘आयुष्यात आनंदाचे उत्सव फार कमी अनुभवायला मिळतात. माझ्या 10 वर्षाच्या तळमावल्याच्या काळात अनेक आनंदाचे उत्सव अनुभवता आले. या काळात अनेक विचारवंतांचा सहवास लाभला. माझ्या मते शिक्षक, प्राचार्य यांना जगदीशचंद्र बोस यांचा डोळा तर रवींद्रनाथ टागोरांचे हृदय असायला हवे. त्यांच्याच हातून नवनिर्मिती घडते.
प्रास्ताविक व स्वागत समारंभात माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ माने म्हणाले, ‘‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि थोर देशभक्त काकासाहेब चव्हाण या दोन महर्षींच्या पवित्र चरण कमलानी ही नागटेकडी पुनीत झाली आहे. मी आज ज्या क्षेत्रामध्ये उभा आहे तो या माझ्या कॉलेजमुळेच. विद्यार्थी-विद्याथिर्नींच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी मंडळ सर्वतोपरी सहकार्य करील असे ते म्हणाले. कॉलेज परिसरात प्रशस्त क्रीडासंकुल उभारण्याचे माजी विद्यार्थ्यांचे स्वप्न लवकरच पूर्णत्वाला नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखविला. समाजोपयोगी शिबीरे, व्याख्यानमाला आयोजन, प्रशिक्षण उपक्रम आदी उपक्रमांना महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
अनेक वर्षानंतरची गुरुजन, विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या अनोख्या भेटीने सर्वजण आनंदून सुखावून गेले होते. आपल्या गुरुदेवांनी आदर्श जीवन जगत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या ज्ञानाची मोठी गुंतवणूक करुन असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनाला चांगला आकार दिला. सद्भावना, प्रेम, सद्विचार, वासल्य, बंधुभाव या संस्कारासोबतच जीवन जगण्याचे ज्ञान रुजविले. या गुरुऋणातून उतराई होणे अशक्य आहे अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजाभाऊ माने, पी.डी.पाटील, प्रा.ए.बी.कणसे, प्रा.आर.यु.माने, विक्रांत सुपुगडे, प्राचार्य डॉ.अरुण गाडे व वाल्मिकी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक मा. अशोक माने यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. पाहुण्यांचा परिचय प्रा.उत्तमराव माने यांनी करून दिला. सुत्रसंचालन प्रा.सुरेश रजपूत, प्रा.सुरेश यादव, प्रा.सचिन पुजारी, प्रशांत जंगाणी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य आर.के.भोसले यांनी मानले. कार्यक्रमास संस्था पदाधिकारी, माजी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
_____________________________
काॅलेजचे पहिले प्राचार्य व्ही.बी.सासनुर यांना मरणोत्तर डाॅ.बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे याच दिवशी त्यांची पुण्यतिथी होती. या आठवणींने त्यांचे कुटुंबीय भावनिक होवून गेले.
_____________________________
काॅलेजचे अनेक माजी प्राचार्य आपल्या कुटूंबियांसह कार्यक्रमाला वेळेत हजर राहिले होते. त्यांचे काॅलेजप्रती असलेले प्रेम यामधून दिसून आले.
_____________________________