कर्मवीरांना शब्दचित्रांतून डाॅ.संदीप डाकवेंनी केले अभिवादन

 


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा;

‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ असा मूलमंत्र देत संपूर्ण महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात शिक्षणाची गंगोत्री पोहोचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची सोमवारी दि.9 मे, 2022 रोजी पुण्यतिथी येत आहे. अक्षरमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘कर्मवीर’, ‘रयत’, ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’, ‘आण्णा’ अशा शब्दांमध्ये कर्मवीर आण्णांची आकर्षक, प्रमाणबध्द विविध रेखाचित्रे चितारली आहेत. त्याची परिसरातून प्रशंसा होत आहे. यापूर्वी रांगोळी, पेंटींग यामधून देखील कर्मवीरांची चित्रे रेखाटत त्यांना अभिवादन केले आहे.

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवे यांच्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड, हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड, वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड या विश्वविक्रमांची नोंद घेणाऱ्या पुस्तकात झाली आहे.

22 सप्टेंबर, 2020 ला कर्मवीरांच्या 133 व्या जयंतीनिमित्त पोस्टकार्डवर डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘कर्मवीर’ हे शब्द 133 वेळा सुंदर अक्षरात लिहून कर्मवीरांना अभिवादन केले होते. तसेच पत्राच्या वरच्या डाव्या बाजूला 22.09.2020 ही तारीख तर दोन्ही बाजूला ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’, हे वाक्य लिहले होते. पाठीमागील बाजूला ‘रयत’ ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या शब्दात रयत शिक्षण संस्थेचे बोध चिन्ह असलेले वडाचे चित्र मोठया कौशल्यपूर्वक रेखाटले होते.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या अनुषंगाने प्रत्येक वर्षी अनोख्या पध्दतीने अभिवादन करावे या भावनेतून हा उपक्रम राबवला असल्याचे अक्षरमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी सांगितले आहे.