लाखो भाविकांच्या उपस्थितीत नाईकबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न.

श्री क्षेत्र नाईकबा डोंगरावर उसळला भाविकांचा महापूर. "नाईकबाच्या नावानं चांगभलं

बनपुरी| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बनपुरी तालुका पाटण येथील श्री क्षेत्र नाईकबा देवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस होता. कालपासूनच महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून लाखो भाविकांचा लोंढा श्री क्षेत्र नाईकबा डोंगरावर जाण्यासाठी सुरू होता.

 पाटण तालुक्यातील बनपुरीचे हे जागृत देवस्थान आहे. श्री नाईकबा यात्रेस गुढीपाडव्या पासून प्रारंभ झाला.   बुधवार दि. 6 रोजी नैवेद्य व आज गुरुवार, दि. 7 रोजी पालखी सोहळा  "नाईकबाच्या नावानं चांगभलं'च्या गजरात अभूतपूर्व गर्दीच्या महापुरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 बनपुरीच्या डोंगरमाथ्यावर श्री नाईकबाचे पश्चिमाभिमुखी मंदीर आहे. मंदिराचा परिसर हिरव्यागार वनराईत व चाफ्यांच्या झाडांनी वेढलेला  कोल्हापूर, सांगली, कुरूंदवाड विभागातून आलेल्या सुमारे ४0 ते ५0 सासनकाठ्या व पालख्यांनी सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. 

 कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे सर्व देशात  लॉकडाऊन असल्याने गेली दोन वर्ष भाविकांना यात्रेच्या उत्सवात सहभागी होता आले नाही. मात्र यावेळी कोरोना संकट टळल्याने व शासनाने परवानगी दिल्याने श्री नाईकबा देवाची यात्रा गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडून भक्तिमय वातावरणात व शांततेत संपन्न झाली. आज पहाटे पालखी सोहळ्यास सासनकाठ्यांसह प्रारंभ झाला.महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून या नाईकबा देवावर अपार श्रद्धा असलेले लाखो भाविक श्री नाईकबा च्या नावानं चांगभलंच्या गजरात गजर करत नाईकबा देवाच्या दर्शनासाठी या उत्साहात सहभागी होण्यासाठी आले होते.

 सुमारे तीन ते चार लाख भाविकांनी या उत्सवासाठी उपस्थिती लावली होती. संपूर्ण नाईकबा डोंगर गर्दीने फुलून गेला होता. गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत "नाईकबाच्या नावानं चांगभलं च्या" घोषणांनी अवघा डोंगर माथा दणाणून गेला होता.

      श्री नाईकबाला यात्रा कालावधीमध्ये होणारी पिण्याच्या पाण्याची गैरसोय लक्षात घेवून बनपुरी ग्रामपंचायतीने भारत निर्माण योजनेतून पाणीपुरवठा योजना पूर्ण केली आहे. त्यामुळे यात्रा टॅंकरमुक्त पार पडली. पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

लाखो लोकांनी उपस्थिती लावल्याने गर्दीचे सर्व रेकॉर्ड आजच्या यात्रेने मोडीत काढले मात्र चोख पोलिस बंदोबस्त असल्याने यात्रा शांततेत, व मोठ्या उत्साहात पार पडली.

यावेळी पाटण चे प्रांताधिकारी सुनील गाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड, तहसीलदार रमेश पाटील, नायब तहसीलदार प्रशांत थोरात, मंडलाधिकारी प्रवीण शिंदे, कराड तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक खोबरे, पाटण पोलीस स्टेशनचे निरीक्षक चौखंडे, मल्हारपेठ पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सपोनि संतोष पवार यांच्या अचूक मार्गदर्शनाने यात्रा बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अंमलदार, पोलीस पाटील, होमगार्ड, गुन्हे अन्वेषण विभाग, सातारा, सांगली, कोल्हापूर पोलीस अमलदार यांचा कडक बंदोबस्त होता. 

यात्रा शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी ग्रामपंचायत बनपुरी, देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी बनपुरी व ढेबेवाडी विभागातील सर्व पोलीस पाटील, स्वयंसेवक यांनी पोलीसांना विशेष सहकार्य केले.

प्रशासन, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, महसूल विभाग, आरोग्य विभाग,ग्रामस्थ, यात्रा कमिटी, स्वयंसेवक व उपस्थित असलेले भाविक या सर्वांच्या सहकार्यातून यावर्षीची श्री क्षेत्र नाईकबा देवाची यात्रा व आजचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला.