बनपुरीचा श्री नाईकबा : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान.

  

 बनपूरी (प्रमोद पाटील याजकडून )

महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान, पाटण तालुक्यातील बनपुरीचे जागृत देवस्थान श्री नाईकबा यात्रेस गुढीपाडव्यादिवशी प्रारंभ झाला असून आज बुधवार, दि. 6 रोजी नैवेद्य आणी गुरुवार, दि. 7 रोजी पालखी सोहळा होणार आहे. त्यानिमित्त...

बनपुरीच्या डोंगरमाथ्यावर श्री नाईकबाचे पश्चिमाभिमुखी मंदीर आहे. मंदिराचा परिसर हिरव्यागार वनराईत व चाफ्यांच्या झाडांनी वेढलेला आहे. श्री नाईकबा देवाच्या बाबतीत रहस्यमय आख्यायिका आहे. जानुगडेवाडीतील जानुगडे भावपणात तीन भाऊ व एक बहीण असे कुटुंब होते. त्या बहिणीचे नाव होते कृष्णामाई. ती गुरे चारण्यासाठी डोंगरावर जात असे. गुरांच्या कळपातील काळ्या रंगाची कपीला नावाची कालवड तिची नजर चुकवून रोज एका मोठ्या दाट जाळीच्या आत जात असे. हे कृष्णामाईच्या ध्यानात आल्यानंतर तिचा पाठलाग करत ती धाडसाने त्या दाट झाडीमध्ये गेली. त्यावेळी ती काळी कपीला गाय एका मोठ्या शिलावर दुधाच्या धारा सोडत होती. त्यावेळी साक्षात श्री नाईकबा देवाने तिला दर्शन दिले. गुरे घेऊन ती घरी निघाली व एक छोटी टेकडी उतरून खाली आली. त्यावेळी तिला मोठा गडगडाट ऐकू आला. आवाज ऐकूण ती घाबरली व तिने मागे वळून पाहिले असता, ती शिला अंगावर येत असल्याचे दिसून आले. तिने घाबरत शिलेला हाताचा स्पर्श होताच ती शिला तेथे थांबली व दुभंगली गेली. त्या शिलेतून श्री नाईकबा स्वयंभू शिव पिंडीसारखी मूर्ती प्रकटली व तेजाने झळकू लागली, अशी आख्यायिका सांगितली जाते.

      चैत्र पाडव्यापासून येथील यात्रेला सुरूवात होते व चैत्र शुक्ल पंचमी, षष्टीला मोठी यात्रा भरते. गुढीपाडव्यावेळी कराडच्या शिंदे व रैनाक कुटुंबांची मानाची सासनकाठी श्री नाईकबा डोंगरावर येते. त्याचवेळी विभागातील काळगाव व कोळे येथील भोई समाजाच्या सासनकाठ्याही येतात. कोल्हापूर, सांगली, कुरूंदवाड विभागातून आलेल्या सुमारे ४0 ते ५0 सासनकाठ्या व पालख्यांचा समावेश असतो.  बुधवार दि.६ नैवेद्याचा दिवस असून गुरुवार दि. 7 रोजी पहाटे पालखी सोहळा आहे. 'नाईकबाच्या नावानं चांगभलं'च्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत सासनकाठ्यांसह श्री नाईकबाचा छबिना निघतो. यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची मोठी गर्दी होत असते. श्री नाईकबा देवस्थान शासनाने 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये समाविष्ठ केले आहे,देवस्थानच्या विकासास प्रारंभ झाला आहे. याचाच एक भाग म्हणून भाविकांच्या सोईसाठी मंदिराच्या पाठीमागे भक्तनिवास बांधण्यात आले आहे.दुसऱ्या भक्तनिवासाचे काम पूर्ण झाले आहे. 

      श्री नाईकबाला यात्रा कालावधीमध्ये होणारी पिण्याच्या पाण्याची गैरसोय लक्षात घेवून बनपुरी ग्रामपंचायतीने भारत निर्माण योजनेतून पाणीपुरवठा योजना पूर्ण केली आहे. त्यामुळे यात्रा टॅंकरमुक्त पार पडली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी यात्रेसाठी महिंद धरणातून वांग नदीत पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे भाविकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. तीर्थक्षेत्र नाईकबा परिसरात पर्यटनास मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या असून त्यासाठी बनपुरी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे शासनाकडून देवस्थानचा 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश झाला असला तरी म्हनावा तीतका निधी उपलब्ध झालेला नाही यामुळे नाईकबा डोंगरावर विकासाची कामे अपूर्ण आहेत.नाईकबा परिसरात विकास करण्यासाठी शासनाने ब वर्ग तीर्थक्षेत्रामधुन निधी बनपुरी ग्रामपंचायतीस उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी नाईकबा भाविकांच्या मधून होऊ लागली आहे, शासनाने निधी उपलब्ध करून देवस्थान परिसरात विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. बनपुरी देवस्थान हे राज्यातील नावलौकिक असणाऱ्या देवस्थांनामध्ये गणले जाता असल्याने नाईकबा डोंगरावर पर्यटनासाठी मोठी संधी निर्माण होणार आहे आसा विश्वास बनपुरी ग्रामस्थांसह भाविकांनी व्यक्त केला आहे. 

     यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी नाईकबा यात्रा कमिटी बनपुरी,ग्रामपंचायत बनपुरी, देवस्थान ट्रस्ट,विकास सोसायटीचे पदाधिकारी, महेश पाटील इंन्फ्राटेक बनपुरी, आणि ग्रामस्थ प्रयत्नशिल आहेत. या यात्रेसाठी महेश पाटील आणि कंपनी बनपुरीचे विशेष सहकार्य लाभले आहे.