श्री नाईकबा देवाच्या यात्रेस आजपासून प्रारंभ . प्रशासकीय यंत्रणा सज्ज

सणबूर| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री नाईकबा देवालयाचे मंदीर पाटण तालुक्यातील ढेबेवाडीपासून पश्चिमेस 5 कि.मी. अंतरावर आहे. बनपुरी व जानुगडेवाडीचे ग्रामदैवत असलेल्या नाईकबा देवाची यात्रा प्रत्येक वर्षी चैत्र शुक्ल षष्टीला असते. या वर्षीही बुधवार, दि.6 रोजी नाईकबा देवाच्या यात्रेतील नैवेद्याचा दिवस असून गुरुवार, दि. 7 रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास सासनकाठ्यासह छबिना निघणार आहे. या उत्सवासाठी बनपुरी ग्रामपंचायत व प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

         गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी भाविक व कराड येथील शिंदे व रैणाक कुटूंबियांची मानाची सासनकाठी जानुगडेवाडी येथे जानुगडे पुजाऱ्यांकडे मुक्कामास येते. दुसऱ्या दिवशी स्नान करून व बैलांची पूजा करून नाईकबा देवास जातात. शिंदे व रैणाक कुटूंबियांच्या मानाच्या सासनकाठीबरोबर औंध संस्थानची सासनकाठी व इतर ठिकाणाहून पंचमीपर्यंत विविध देवांच्या सासनकाठ्या नाईकबा येथे येतात. यात्रा काळात महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविक यात्रेसाठी दाखल होतात. या भाविकांना योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी बनपुरी ग्रामस्थ, श्री नाईकबा देवस्थान ट्रस्ट व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.कोरोनामुळे गेल्या दोन वर्षी याञा भरली नव्हती त्यामुळे भाविकां मध्ये उत्साहाचे वातावरण आहे, यावर्षी मोठ्या संख्येने भाविक येतील असा अंदाज आहे

      श्री नाईकबा देवाचा याञेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविक दरवर्षी यात्रेला गर्दी करत असल्यामुळे उत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, येणाऱ्या सर्व भाविकांना देवाचे दर्शन व्हावे, वाहतूक, पार्किंगसह निवासाची सोय व्हावी, याकरिता प्रांताधिकारी पाटण, तहसीलदार पाटण, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पंचायत समिती, ग्रामपंचायत बनपुरी, देवस्थान ट्रस्ट आदी खात्यांची संयुक्त बैठक घेवून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही यात्रा प्रथा परंपरेप्रमाणे शांततेत साजरी व्हावी, यासाठी महसूल विभाग, पोलीस विभागासह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या यात्रेसाठी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेला आहे.