श्री. नाईकबाच्या यात्रेसाठी बनपुरी ग्रामपंचायत सज्ज सरपंच, उपसरपंच यांची माहिती

सणबूर|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

तीर्थक्षेत्र बनपुरी येथील नाईकबा देवाच्या यात्रेचा  बुधवार आणि गुरुवार मुख्य दिवस असून या यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी ग्रामपंचायत बनपुरी कटिबध्द असून भाविकांना सर्व सुविधा नाईकबा डोंगर परिसरामध्ये पुरविल्या आहेत. यात्रेसाठी ग्रामपंचायत बनपुरी सज्ज असल्याची माहिती सरपंच सौ. नर्मदा कुंभार, उपसरपंच अशोक जगदाळे, माजी उपसरपंच शिवाजीराव पवार यांनी दिली.

        कोरोना निर्बंधांमुळे गेली दोन वर्षे याञा भरली नव्हती त्यामुळे भाविकांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण आहे यामुळे यावर्षी मोठ्या संख्येने भाविक येतील असा अंदाज आहे आणि नाईकबा देवस्थान हे बनपुरीच्या डोंगरावर असल्यामुळे या ठिकाणी भाविकांना योग्य त्या सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीला मोठा खर्च करावा लागतो. यात्रेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान खूपच कमी मिळत आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता बनपुरी ग्रामपंचायतीला शासनाने यात्रा अनुदानात वाढ करावी, अशी भावना नाईकबा भक्तांसह ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

   नाईकबा देवस्थानचा 'ब' वर्ग पर्यटन क्षेत्रामध्ये आघाडी शासनाने समावेश केला आहे. यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होईल, असे भाविकांची अपेक्षा होती.परंतु  गेल्या काही वर्षामध्ये याठिकाणी अपवाद वगळता कोणत्याही प्रकारचा 'ब' वर्गमधून निधी आलेला नाही. यामुळे या ठिकाणचा म्हणावा तितका विकास झालेला नाही. या यात्रेसाठी लाखो भाविकांची उपस्थिती असल्यामुळे शासनाने याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे.नाईकबा देवस्थानच्या विकासासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी भावना नाईकबा भक्तांनी व्यक्त केली आहे.

      नाईकबा यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन, ढेबेवाडी पोलीस, नाईकबा देवस्थान ट्रस्ट,आरोग्य विभाग, महसूल विभाग, महेश पाटील इंन्फ्राटेक प्रा.लि बनपुरी, संजीवनी राईस मिल बनपुरी, मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान,यांचे ग्रामपंचायतीला चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत आहे. त्यामुळे यावर्षीचा यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.