करपेवाडी येथील श्री मसनाई माता यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
करपेवाडी ता पाटण हे सांप्रदायाचा वारसा असणारे गाव. येथील श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे हे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने सर्वत्र उत्साही वातावरण होते. सालाबाद प्रमाणे नुकतीच मसनाई देवीची यात्रा पार पाडली. पारायणाच्या सातव्या दिवशी जागराचें किर्तन सेवा ह भ प नवनीत महाराज यांचे झाले. सायंकाळी श्री ची आरती ग्रामस्थ, देवस्थानचे मानकरी भाविक भक्त यांचे उपस्थितीत करण्यात आली. त्यानंतर श्री मसनाई मातेचे मानकरी करपेवाडी पूर्व विभागातील तानाजी गोविंद करपे यांच्या स्थानापासून श्री मसनाई मातेच्या पालखीचे सायंकाळी भव्य स्वागत महाआरती करून वाजत गाजत सासन काठ्या सह मूळ मंदिरात पालखी विसावते त्यानंतर विविध 8 सासन काठ्या वाजत गाजत, जल्लोष करत मंदिर परिसरात दाखल होतात त्यानंतर जागराचें किर्तन, भजन, पहाटे काकड आरती, सकाळी श्री मसनाई देवीची आरती, देवीच्या आरती नंतर पालखी,सासनकाठी सह मानकरी व ग्रामस्थ छबिन्यासाठी मार्गस्थ होतात एक किलोमीटर पर्यंत छबिन्याची मिरवणूक होते यावेळी अनेक भाविक भक्त, माहेरवाशिणी, महिला छबिन्याच्या वाटेवर वाट पाहत देवीच्या पालखीतील देवतेला साकडे घालून दर्शन घेतात. वाजत गाजत सासनकाठ्या आकाशाकडे झेपावत भाविक भक्त जल्लोषात नाचवतात, व भवानी मातेच्या मंदिरात पालखी स्थानापन्न होते त्यानंतर भवानी मातेची महाआरती होते, सर्व भाविक भक्त मनोभावे देवीचेदर्शन घेतात परत मुळ मार्गस्थ छबिना होतो मुळ मंदिराच्या परिसरात या देवीच्या पालखीचे गोल रिंगण साधारणपणे 1 तास होते यावेळी परिसरातील भाविकभक्त, माहेरवाशिन, ग्रामस्थ भक्ती भावाने गुलालाची उधळण करतात हे रिंगण अत्यंत पाहण्यासारखे असते यावेळी देवीच्या नावाने चांगभलं असा गजर करण्यात येतो या नंतर पालखी मंदिरात थांबते त्या नंतर प्रत्येक आवाडातील भाविक दंडस्थान आपल्या घरापासून देवीच्या मंदिरा पर्यंत घेतात, 11 ते 12 वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन नंतर दहीहंडी सोहळा संपन्न झाला.  यात्रेतील पारंपरिक तमाशा व कुस्तीस फाटा दिला गेला व यात्रा भक्ती मय वातावरणात संपन्न झाली.