कुंभारगाव विभागातल्या यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत 'चांगभल' चा गजर.

कुंभारगाव विभागातल्या यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत 'चांगभल' चा गजर.            

तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

 गुढीपाडव्यानंतर पाटण तालुक्यातील कुंभारगाव विभागातील यात्रा,भंडाऱ्याचा शुभारंभ होत असतो. आपले श्रद्धास्थान असलेल्या देवी देवतांच्या यात्रा म्हणजे एक अलौकिक सांस्कृतिक ठेवणं होय. प्राचीन काळा पासून आपल्या देवी देवतांच्या यात्रा श्रद्धेने भक्ती भावाने मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात या निमित्ताने वर्षातून एकदा पाहुणे, राऊळे, लेकी सुना यात्रेसाठी जमा होतात वर्षातून एक वेळ होणारी यात्रा म्हणजे स्नेहसंमेलनच होय. गुलाल खोबऱ्याची उधळण, बोलेले नवस फेडणे, मेवा मिठाईची रेलचेल, खेळणे, पाळणे, तमाशाची नशा अन कुस्त्यांचा फड सार कस उत्साहवर्धक प्रसन्न, आनंदी वातावरण "आनंदाची डोही आनंद तरंग " असेच वातावरण होते. परंतु गेले दोन वर्ष यात्रा, सार्वजनिक समारंभावर निर्बध असल्याने कोणतेही समारंभ झाले नव्हते नुकतेच शासनाने निर्बंध मुक्त केलेने ग्रामीण विभागातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पुणे, मुबंई, परगावी असणारी मंडळी यात्रे निमित्त आपआपल्या गावी मोठ्या संख्येने आले होते त्यामुळे यात्रा मोठ्या गर्दीने फुलून गेल्या होत्या व मोठा आनंदाचा जल्लोष पाहायला मिळाला. 

 कुंभारगाव विभागात प्रथम (1)बामणवाडी येथील म्हसोबा देवाच्या यात्रेने सुरवात झाली (2)गलमेवाडी नाईकबा देवाची (3)चाळकेवाडी भैरवनाथ देवाची, (4)कुंभारगाव मधील शंभू महादेवाची पालखीतून गाव प्रदक्षिणा (5)कुंभारगाव कुंभारवाडी येथील पाऊतका वेशीवरील श्री लक्ष्मी देवीचा भंडारा (6)यादववाडी येथील जोतिबा देवाची यात्रा (7)कुंभारगाव कळंत्रेवाडी वेशीवरील पाऊतका श्री लक्ष्मी देवी व कळंत्रेवाडी येथील हनुमान जयंती भंडारा. 

 अशा विविध गावच्या यात्रा संपन्न झाल्या. चाळकेवाडी, यादववाडी यात्रा कमिटीने कुस्त्यांचे जंगी मैदान भरवले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते मल्लाना प्रोहत्सान मिळावे यासाठी मोठे बक्षीस देण्यात आले होते. 



या परिसरातील यात्रेसाठी वाडीवस्ती मधील देवदेवतांच्या पालख्या, सासन काठ्या वाजतगाजत एकमेकांच्या यात्रेस देवदेवता च्या पालखी सह यात्रेस जातात. 8 देवीदेवतांच्या पालख्याचा छबिना एका मागोमाग एक अशी भव्य छबिन्याची मिरवणूक हा डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण असतो. यावेळी छबिन्याच्या वाटेवर भावीक, ग्रामस्थ, माहेरवाशीण, महिला वर्ग मोठ्या संख्येने या पालखीतील देवदेवतांना ओवाळतात व साकड घालतात. यावेळी मोठ्या उत्साहात भाविक सासन काठ्या उंच उंच आकाशाकडे वर झेपावत नाचवत असतात. देवदेवतांच्या नावे चांगभलं चा गजर होत असतो. 

 दोन वर्षानंतर झालेल्या या उत्सवास भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. एकूणच भाविक भक्त ग्रामस्थ, महिला वर्ग याच्या चेहऱ्यावर या उत्सवाचा आनंद ओसंडून वाहत होता.