उद्यापासून पुण्यात राज्यस्तर आर्टिस्टीक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचा थरार’

पुणे|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

दिनांक २३ व २४ रोजी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे ५५ व्या कनिष्ठ व वरिष्ठ गटातील मुला-मुलींच्या स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेत मुलांच्या १७ वर्षाखालील व १७ वर्षावरील आणि मुलींच्या १५ वर्षाखालील व १५ वर्षावरील मुलींच्या स्पर्धा होणार आहेत. कोविड काळानंतर तब्बल दोन वर्षांनंतर राज्यस्तर अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केल्या गेल्या असून खेळाडूंनी यासाठी जय्यत तयारी केली आहे असे महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे व सचिव मकरंद जोशी यांनी माहिती दिली. 

या स्पर्धेतूनच दिनांक ८ ते १० मे यादरम्यान अंबाला, हरियाणा येथे होणार्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. या स्पर्धेत मुलांच्या कनिष्ठ गटात दक्षिण मध्य आशियाई स्पर्धेत पदक मिळवणारा ठाण्याचा ओंकार शिंदे आणि मुंबईचा मानस करंदीकर तसेच वरिष्ठ गटात क्रीडा प्रबोधिनीचा गणेश नवले हे आपले कौशल्य सादर करणार आहेत. मुलींच्या वरिष्ठ गटात नुकत्याच जपान येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झालेली ठाण्याची श्रद्धा तळेकर, आंतराष्ट्रीय खेळाडू वैदेही देऊळकर आणि साईची सिद्धी हत्तेकर ही चित्तथरारक कौशल्य सादर करणार आहेत. सदर स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय शेटे तसेच पिंपरी चिंचवड जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय मंगोडेकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे सचिव डॉ. मकरंद जोशी, पिंपरी चिंचवड जिम्नॅस्टिक्स संघटनेचे सचिव श्री. संजय शेलार हे उपस्थित असणार आहेत. या स्पर्धेस क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त श्री. ओमप्रकाश बकोरीया हे भेट देणार आहेत. सदर सर्धेसाठी साईचे वरिष्ठ प्रशिक्षक श्री. रामकृष्ण लोखंडे हे स्पर्धा प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत तर श्री. प्रवीण ढगे व सौ. संजीवनी पूर्णपात्रे ते तांत्रिक समिती प्रमुख असणार आहेत.राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने स्पर्धा निरीक्षक म्हणून श्री. योगेश शिर्के यांची निवड केली आहे.