कर्तुत्ववान माजी विद्यार्थी हेच त्या शाळेचे खरे वैभव: डॉ. यशवंत पाटणे

वाझोली प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थी संघ आदर्शवत.



तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
वाझोली प्राथमिक शाळेचा माजी विद्यार्थीसंघ चांगले काम करत असून संघाच्या सदस्यांनी एका वर्षात शाळेचं रूपडं बदलल आहे. आज विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करणारे कर्तृत्ववान विद्यार्थी हेच शाळेचे खरे वैभव असते. आजचा हा मेळावा म्हणजे शाळेविषयीचा कृतज्ञतेचा आणि प्रेमाचा सोहळा आहे. या संघाच्या माध्यमातून चांगले संस्कारपीठ निर्माण व्हावे आणि चांगली मुलं घडावीत. हा संघ या विभागात इतर शाळांना आदर्शवत राहील असे काम करावे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व प्रसिद्ध वक्ते प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.

                    वाझोली ता.पाटण येथे जि. प. प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थी संघाचा मेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ढेबेवाडीचे स.पो. नि.संतोष पवार, वांगव्हॅली पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय लोहार, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, सरपंच शीतल लोहार, उपसरपंच सविता मोरे, माजी सरपंच अशोक मोरे, पोलिस पाटील विजय सुतार, जयवंत मोरे, सुभाष मोरे, डॉ.संदीप डाकवे, सतिश कचरे, प्रा.सुरेश पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील, जयवंत पाटील फौजी, जयवंत मोरे, विलास पाटील, संदीप पाटील सुनील लोहार आदी प्रमुख उपस्थिती होती.

      डॉ.पाटणे पुढे म्हणाले, "शाळा हे ज्ञानाचे मंदिर असते, येथे गुणवत्ता व विविधता यांना महत्व दिले जाते. मुलांचे जीवन दगडासारखे असते त्याला आकार दिला की सुंदर शिल्प घडते शाळेत कळ्यांची फुल तयार होत असतात. मुलांचे सामर्थ्य ओळखून त्यांना संधी दिली पाहिजे. शिक्षणातून स्वतंत्र विचारांचा सुसंस्कृत सक्षम आणि समजोपयोगी माणूस घडला पाहिजे. आपणास आयुष्याच्या परीक्षेत पास होणारे विद्यार्थी घडवायचे आहेत. जीवनात माणसाने टक्के-टोणपे खावून मिळवलेले यश अतिशय महत्वाचे असते. वाझोली माजी विद्यार्थी संघाचे कार्य कौतुकास्पद आहे. माजी विद्यार्थी मेळावा आपल्या शालेय जीवनातील सोनेरी आठवणी जागवणारा दिवस आणि शाळेविषयी कृतार्थ भावना निर्माण करणारा क्षण असतो. शाळेस ९० वर्षे पूर्ण झाली असून येत्या १० वर्षात शतक महोत्सव साजरा करताना माजी विद्यार्थी संघ आपली शाळा समृध्द सुसज्ज करून इतरांसाठी आदर्श निर्माण करेल. " असे मत त्यांनी व्यक्त केले.

         यावेळी संजय लोहार यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. आनंदा मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप वीर, सतिश कोकाटे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. विजय सुतार यांनी आभार मानले. यावेळी डॉ.पाटणे यांच्या हस्ते माजी विद्यार्थी, देणगीदार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आजपर्यंत शिकवणारे शिक्षक राजाराम सावंत, जनार्दन अरबुणे, रत्नमाला थोरात, भारती पाचुपाते, विलास येळवे, रामचंद्र पाटील, दत्तात्रय जोशी, मनीषा जोशी, अधिकराव देसाई, सीमा देसाई, नारायण पाटील, बाळासाहेब मुठे, राजेंद्र पवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.