गावाकडची माती आणि माणसं यांच्याशी जोडलेली प्रानाची नाळ यापुढेही अतूट, तितकीच मजबूतही राहील:डॉ सौ. प्राची पाटील

ढेबेवाडी ता.पाटण येथे प्राना फाऊंडेशनच्या वतीने महिला मेळावा उत्साहात संपन्न.

ढेबेवाडी : महिला  मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ.सौ.प्राची पाटील समोर उपस्थित महिला.

ढेबेवाडी| कृष्णाकाठ वृत्तसेवा : 

'समाज सेवेचा वसा अन् वारसा घेवून वाटचाल करणारे प्राना फौंडेशन महिलांच्या आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक उन्नतीत देत असलेले योगदान ही समाजाप्रतीची कृतज्ञता आणि तळमळ असून गावाकडची माती आणि माणसं यांच्याशी जोडलेली प्रानाची नाळ यापुढेही अतूट, घट्ट तितकीच मजबूतही राहील.असे प्रतिपादन प्राना फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ सौ. प्राची पाटील यांनी आज येथे केले.

प्राना फाऊंडेशनच्या वतीने आज येथे महिला मेळावा झाला,त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. डॉ.सौ.पाटील म्हणाल्या, विशिष्ठ चाकोरी आणि चौकटीत बंदिस्त असलेल्या ग्रामीण भागातील महिलांना त्यांचे हक्क आणि ताकदीची ओळख करून देवून सक्षम बनविण्यासाठी प्रानाची धडपड सुरू आहे.केवळ प्रबोधनच नव्हे तर त्यांना विविध प्रकारचे व्यवसायिक शिक्षण आणि आवश्यक ती ताकद देवून स्वबळावर उभे करण्याचे काम प्राना करत आहे.

महिला सक्षमीकरणाबरोबरच सेंद्रीय शेती व विषमुक्त अन्न या संकल्पनेतून प्रानाने शेतकऱ्यांच्या जिवनात परिवर्तनाची नवी पहाट आणली आहे.माथाडी कामगारांचे आराध्य दैवत (कै) आमदार अण्णासाहेब पाटील, व वत्सलाताई पाटील यांचा समाजसेवेचा वारसा आणि आशिर्वाद, माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे प्रोत्साहन व पाठबळ आमच्या पाठीशी आहेत. प्राना म्हणजे आत्मसन्मान, प्राना म्हणजे एकता असून तुमचा आत्मसन्मान अखेरच्या श्वासापर्यंत कायम ठेवा.व्यक्तिगत व सामाजिक जीवनात सक्रिय राहताना वयाची मर्यादा कधीच येवू देऊ नका. मनाने तरुण आणि जिवंत रहा. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख म्हणाले, अण्णासाहेब पाटील यांच्या परिवाराला सामाजिक कार्याचा फार मोठा वारसा असून डॉ.सौ प्राची पाटील यांनी तो आत्मीयतेने जपत ग्रामीण भागातील महिलांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केलेले आहे. स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळत त्यांनी उभ्या केलेल्या या कार्याला तोड नाही.त्यांच्या हाकेला ओ देत खेड्यापाड्यातून मोठ्या संख्येने धावत येणाऱ्या महिला हीच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे.मेळाव्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा व विविध परीक्षातून चमकलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.विविध गावातील महिला, बचत गटांच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या. चिमुकल्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांना उपस्थितांची उस्फुर्त दाद मिळाली.