महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळा काल सायंकाळी पार पडला. या सोहळ्यात खासदार श्रीनिवास पाटील आणि जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीनिवास पाटील यांनी राजकारणात येण्यामागचे घटनाक्रम सांगितले.
कटगुणच्या महात्मा फुलेंची पगडी, पदरात काय घ्यावं ते उपरण नायगावच्या सावित्रीबाई फुले यांच्या जिल्ह्यातील श्रीनिवास तुमच्या समोर उभा आहे. वक्तृत्व, नाट्य, नाट्यछटा, हस्ताक्षर, चित्र याचा नाद होता पण तो नाद जपायचा अभ्यास सोडायचा नाही, नंबर सोडायचा नाही. कसलीच मुभा नव्हती. काय झालचं तर सरळ मुंबई पुण्याची वाट धरायची आणि माथाडी व्हायचं हा बापाचा दम होता. सुदैवानं अभ्यास केला प्रांत झालो. २४ जून १९६५ला कोल्हापूरला निघालो. वडिलांच्या पाया पडलो तेव्हा वडिल म्हणाले तारुण्य, सत्ता आणि संपत्ती हे एकत्र आले आणि जरा जरी घसरलो तरी राजा सुद्धा वाया जातो. त्यामुळं माझ्या कानावर काही आलं तर गोळी घालून ठार मारेंन अस वडिल म्हणाले. त्यामुळं काही जरी समोर आलं तरी वडिलांच्या बंदुकीची नळी दिसते. त्यामुळं कायद्याच्या चौकटीत राहून दोन ओळीत मोकळ्या जागा दिसतात त्यात माणुसकी ठेऊन आलेल्या माणसाचा सन्मान करत गेलो.
माझे गुरु यशवंतराव चव्हाण यांनी २६ जानेवारी १९३२ ला टिळक हायस्कूलच्या मैदानावर झेंडा लावला आणि वंदे मातरम म्हटले. म्हणून १८ महिने शिक्षा झाली. त्यानंतर त्यांच्या आई विठाबाई यांना बोलावले आणि गुन्हा कबुल करण्यास सांगितलं. तर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांनी गुन्हा केला नसल्याचं सांगितलं.यशवंतराव चव्हाण म्हणाले गांधी हिच आमची हॅट आहे.
१९६५ साली प्रांत झालो. माझ्या वडिलांनी माझ्या समोर माझी कधी स्तुती केली नाही. दहावीला पास झालो त्यावर त्यांनी दोन तीन किलो पेढे कोर्टात वाटल्याचे आईने सांगितले. वडील कठोर शिस्तीचे होते. ज्यांनी ज्ञान दिल ते यशवंतराव चव्हाण होते. ३४ वर्ष नोकरी केली आणि १९९९ साली मित्राने बोलावले आणि राजीनामा देऊन ये सांगितले. राजीनामा दिल्यावर सांगितले दोन चार जॅकेट आणि दोन चार टोप्या शिवून घे, असे सांगणारा माझा तो मित्र म्हणजे शरद पवार होय. शरद पवार ठरवतील ते धोरण, बांधतील ते तोरण, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असे काम केले. शारदेचा चंद्र शरदचंद्र आमच्याबरोबर चालत असतो. कुठं उडी मारावी, कशी उडी मारावी याचं ज्ञान त्यांनी आयुष्यभर दिलं. हा शेवटचा सत्कार आहे का म्हणाले. जसं, राज्यपाल केलं तसं संपलं म्हणजे जीवनगौरव, कसं तरी वर्ष दिड वर्ष काढलं. 28 सप्टेंबरला फोन आला. काय करतोय विचारले. कागद गोळा कर आणि फॉर्म भर म्हणून सांगितलं. २७ फॉर्म होते. या बँकेत किती, त्या बँकेत किती, आमचं काहीचं नाही त्यामुळं फॉर्म भरायला सोपं गेलं, अशा अनेक आठवणी श्रीनिवास पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितल्या.