सर्वच क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत हे अभिमानास्पद : डॉ. शैलजा पाटील

श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला दिन उत्साहात संपन्न.



कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
प्राचीन काळापासून महिलांवर अत्याचार होत आहेत. कारण महिला शांत व सोशिक असतात. मात्र सध्या परिस्थिती बदलली आहे. 21 व्या शतकातील महिला स्वतंत्र विचाराच्या, सुशिक्षित व पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत हे अभिमानास्पद आहे. सर्वच क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत मात्र सध्याच्या काळात घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले ही शोकांतिका आहे असे प्रतिपादन डॉ. शैलजा पाटील यांनी व्यक्त केले. 

घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयात महिला दिनानिमित्त महिला मेळावा व आजादी का अमृत महोत्सव या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धा व विद्यार्थिनीच्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सौ.शैलजा पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी त्यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षिका, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी पुढे उपस्थितांना मार्गदर्शन करताना शैलजा पाटील म्हणाल्या आजची स्त्री स्वातंत्र्य आहे. तिला सर्व क्षेत्रात संधी आहे या स्वातंत्र्याचा गैरवापर होऊ नये याचे सर्वांनी भान ठेवणे काळाची गरज आहे. आजच्या स्त्रीला एकत्र कुटुंब पद्धती नकोशी आहे तिला एकटेपण हवे आहे हा विचार थांबवून कुटुंबातील सर्व सदस्यांना आपले मानून आनंदात राहणे पसंत केले पाहिजे. आपली समाजव्यवस्था बळकट व ऐक्याची आहे. कुटुंबातील नाती जोपासणे गरजेचे आहे आपली संस्कृती विचारपूर्वक बनवली आहे सर्वांनी नातेसंबंध टिकवले पाहिजे. स्त्री कोमल आहे पण कमजोर निश्चित नाही सध्या काळ बदलला आहे तुटणारे संसार थांबवणे काळाची गरज आहे. सर्वांनी महाभारत, रामायण, गीता वाचली पाहिजे घरामध्ये वातावरण चांगले ठेवा, चांगली संस्कृती जोपासूया असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 

यावेळी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेल्या मुलींचे शैलजा पाटील यांनी कौतुक केले. यावेळी वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनींनी महिला सक्षमीकरणावर भाषणे केली. या वेळी त्यांनी महिलांचा वर्षातून एकदा सन्मान न होता वर्षातील 365 दिवस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. व महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या.सदर कार्यक्रम सांस्कृतिक कमिटी प्रमुख पूनम यादव यांच्या कमिटीतील सदस्यांनी यशस्वी पार पाडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सीमा शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार भाग्यश्री पाटील यांनी मांनले.