शेतकऱ्यांचे राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान असते त्यामुळे शेतकऱ्यांचाही गौरव झाला पाहिजे : बाळकृष्ण काजारी


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 

शेतकरी संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे असे म्हटले जाते. संपूर्ण जग कोरोना महामारी मुळे बंद असताना शेतकरी मात्र आपल्या शेतात राबत होता. ते फक्त जगासाठी. जस कोरोनामुळे जग थांबलं तसेच शेतकरी जर थांबला तर अवघे जग उपाशी पडेल. म्हणूनच जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांकडे पाहिले जाते. शेतकरीही आपल्या क्षेत्रात मोठे राष्ट्रीय कार्य करत असतो. त्यामुळेच शेतकऱ्यांचाही गौरव झाला पाहिजे, असे मत जनविकास सहकारी पतसंस्थेचे संस्थापक बाळकृष्ण काजारी यांनी व्यक्त केले.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण फौंडेशनकडून सामाजिक, शैक्षणिक, सहकार व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जनविकास पतसंस्थेचे संस्थापक तथा काजारवाडीचे सरपंच बाळकृष्ण काजारी यांचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चाळके, सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले सुभाष बावडेकर यांच्या हस्ते बाळकृष्ण काजारी यांचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सतीश घाटगे होते.

तळमावले येथील 'वांग व्हॅली' भवन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते, यशवंतराव चव्हाण फौंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत, कविता कचरे, गलमेवाडीचे माजी सरपंच दत्तात्रय चोरगे यांच्यासह पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती.