माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण मधील रस्त्यांसाठी २७ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मूलभूत सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे नेहमीच मोठा निधी शासनाकडून मंजूर करून आणत असतात. यावर्षीच्या अर्थसंकल्पातून मतदार संघातील रस्ते विकासासाठी तब्बल २७ कोटी ३० लाख इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी तसेच पुनर्बांधणीसाठी आ. चव्हाण बांधकाम मंत्र्यांकडे प्रयत्न करीत होते त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून मतदारसंघातील रस्ते विकासासाठी मोठा निधी मिळाला आहे. 

या निधीतून पोतले ते विंग हॉटेल या रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणेसाठी १ कोटी ८० लाख, रेठरे ते शेणोली स्टेशन या राज्य महामार्गावरील पंतोजी मळा येथे पुलाचे बांधकाम तसेच रस्त्याची उंची वाढविणेसाठी २ कोटी ४० लाख, किरपे ते पोतले रस्त्याच्या विकासासाठी १ कोटी ५० लाख, कोळे ते कराड तालुका हद्दीपर्यंत च्या रस्त्याचे नूतनीकरणासाठी ५ कोटी ९० लाख, विंग हॉटेल ते कोळे या रस्त्यांच्या बांधकामासाठी ४ कोटी २५ लाख, इमर्सन कंपनी पासून विंग हॉटेल पर्यंत च्या रस्त्याच्या विकासासाठी ४ कोटी २५ लाख, वाठार ते रेठरे खुर्द रस्त्याच्या सुधारणेसाठी ४ कोटी, रेठरे बुद्रुक ते जुळेवाडी रेठरे कारखाना रस्त्याच्या विकासासाठी ४ कोटी असा एकूण २७ कोटी ३० लाख इतका मोठा निधी मतदारसंघातील या भागास मिळणार असून यामुळे पोतले, विंग, शेणोली स्टेशन, किरपे, कोळे, वाठार, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक व जुळेवाडी या सर्व भागातील रस्त्यांच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा निधी अर्थसंकल्पातून मंजूर केला असून या भागातील दळण वळणासाठी मोठी सोय ग्रामस्थांना होणार आहे.