यशवंतराव चव्हाण साहित्य गौरव पुरस्काराने डाॅ.संदीप डाकवे सन्मानित


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील युवा साहित्यिक डाॅ.संदीप डाकवे यांचा यशवंतराव चव्हाण साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानचिन्ह, ग्रंथ आणि शाल देवून सन्मान करण्यात आला. कराड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त दैनिक प्रीतिसंगमचे रौप्य महोत्सवी वर्ष व यशवंतनगरी न्यूज नेटवर्कची व्दिशतकी वाटचाल यानिमित्त आयोजित व्याख्यान आणि साहित्यिक सन्मान सोहळा संपन्न झाला. खासदार श्रीनिवास पाटील, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, शशीकांत पाटील, विकास भोसले व अन्य मान्यवर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान, डाॅ.डाकवे यांनी पत्रकार मधुकर भावे यांना स्केच भेट दिले.

यापुर्वी ‘मनातलं’, ‘जलयुक्त शिवार अभियान’, ‘दीप उजळतो आहे’, ‘समाज स्पंदनाची पत्रे’, ‘स्नेहबंध’, ‘गाठीभेटी’ इ.पुस्तकांचे लेखन डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे. तसेच स्पंदन कवी मनांचं, ज्ञानयात्री, संकल्पपूर्ती, आरतीसंग्रह, स्मरणिका, दिवाळी अंक यासह विविध विशेष अंकांचे संपादन केले आहे.

डाॅ.डाकवे यांनी जलयुक्त शिवार अभियान, तंटामुक्त गाव मोहीम, बचत गट, लेक वाचवा, स्वच्छ भारत अभियान, व्यसनमुक्ती इ.लेखमाला तर मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, माणिकमोती, काटा किर्र, मी सरपंच बोलतोय, वाल्मिकीच्या पठारावरुन, गावोगावच्या समस्या इ.सदरांचे लेखन विविध वृत्तमानपत्रातून केले आहे. ‘पोएट्री माईल स्टोन’ या जागतिक विश्वविक्रमी काव्यसंग्रहात त्यांच्या कवितेची नोंद झाली आहे. तसेच शिवाजी विद्यापीठाच्या नियतकालिक स्पर्धेत कथेला तिसरा क्रमांक मिळला आहे.

याशिवाय डाॅ.डाकवे यांनी वर्तमानपत्रातील कात्रणांचे प्रदर्शन, भित्तीपत्रिका प्रदर्शन आणि 11 पेक्षा जास्त हस्तलिखितांचे प्रकाशन केले आहे. तसेच मुक्काम पोस्ट डाकेवाडी, सेलिब्रिटी कट्टा, ग्रेट स्केच भेट, ऋणानुबंध, आठवणीतील भाऊ, अक्षर शुभेच्छा ही आगामी पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.  

डाॅ.संदीप डाकवेंची साहित्य क्षेत्रातील या कामगिरीची नोंद घेत त्यांना यशवंतराव चव्हाण साहित्य गौरव सन्मान 2022 ने सन्मानित केले आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.