मलकापूर शहराचे सिटी सर्व्हे चे काम 1 मे 2022 पासून सुरु


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
मलकापूर नगरपंचायतीची स्थापना दि.05/04/2008 रोजी ग्रामपंचायतमधून नगरपंचायतीमध्ये रुपांतर होऊन झाली असून, या शहराची शहर विकास योजना दि.01/09/2016 रोजी मंजुर झाली असून, शहरातील नागरिकांना मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करुन देणेसाठी आरक्षणे विकसित करणेत येत असलेमुळे भविष्यामध्ये उद्भवणारे प्रश्न सोडविण्यास मदत झालेली आहे. तसेच शहराची होणारी वाढ ही नियंत्रित व सुनियोजीत होत असलेमुळे नागरिकांना नागरी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणेस नगरपंचायतीस शक्य झालेले आहे. 

मलकापूर शहराचे नगरभुमापन (सिटी सर्व्हे) व्हावे याकरिता नगरपंचायत स्थापनेपासून वेळोवेळी पाठपुरावा करणेत आलेला आहे. तात्कालिन जमा बंदी आयुक्त मा.चंद्रकांत दळवी यांना स्वर्गीय माजी आमदार भास्कररावजी शिंदे यांनी समक्ष भेट देऊन मलकापूर नगरपंचायतीचा सिटी सर्व्हे करणेबाबतची मागणी केली होती. त्यानुसार नगरपंचायतीस दि.14/11/2018 रोजी रक्कम रु. 1.00 कोटीची तरतुद नगरभुमापन करणेत आली असून, सदरचा निधी दि. 23/12/2021 रोजी जिल्हास्तरावर वर्ग करणेत आलेला आहे. 1 कोटीच्या वरती होणारा खर्च नगरपरिषद स्तरावर करणेत येणार आहे. परंतु, राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची नगरभुमापनाची कामे पुर्ण होऊ न शकल्याने मलकापूर शहरासाठी स्वतंत्र घटक उपलब्ध होऊ न शकलेने नगरभुमापनाचे काम प्रलंबित राहिले होते. शहराचे नगरभुमापन होऊन प्रॉपर्टी कार्ड नागरिकांना उपलब्ध होत नसलेमुळे नागरिकांना शासनाच्या व वित्तीय संस्थांच्या कामाबाबत विविध स्तरावर तांत्रिक अडचणी निर्माण होत असलेने नागरिकांच्यामधून सुध्दा लवकरात लवकर नगरभुमापन करणेसाठी नगरपरिषदेकडे मागणी होत होती.     

या सर्व बाबींचा विचार करुन मलकापूर नगरपरिषदेने महसुल मंत्री मा.ना. बाळासाहेब थोरात यांना मा.आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा), माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शिफारशीचे विनंती पत्र देऊन मा.मंत्री महोदय यांनी मलकापूर शहराचे नगरभुमापनासाठी रक्कम रु. 1.00 कोटीचा निधी मंजुर केलेला आहे. मा.आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) हे तात्कालिन मुख्यमंत्री असताना सुध्दा त्यांनी याबाबत पाठपुरावा केलेला होता. मलकापूर शहराचे नगरभुमापन होणार असलेने अनेक नागरिकांचा प्रश्न मार्गी लागणार आहेत. 

मलकापूर शहराचे नगरभुमापन सुरु करणेच्या दृष्टीने प्राथमिक स्वरुपाची बैठक गुरुवार दि.10/03/2022 रोजी मा.किशोर तवरेज, उपसंचालक, भुमी अभिलेख कार्यालय, पुणे, मा.राजेंद्र गोळे, जिल्हा अधिक्षक, भुमी अभिलेख कार्यालय, सातारा, मा. प्रविण पवार, उपअधिक्षक, भुमी अभिलेख कार्यालय, सातारा व मा. बाळासाहेब भोसले, उपअधिक्षक, भुमी अभिलेख कार्यालय, कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत मलकापूर नगरपरिषद बहुउद्देशिय इमारत, सभागृह, दुसरा मजला, लक्ष्मीनगर, मलकापूर या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीस नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.निलम येडगे, उपनगराध्यक्ष श्री.मनोहर शिंदे, बांधकाम सभापती श्री.राजेंद्र यादव, मुख्याधिकारी श्री.राहुल मर्ढेकर, नगरसेवक श्री.अजित थोरात, श्री.प्रशांत चांदे, सहा.नगररचनाकार श्रीमती प्रियांका धनवडे, नगरअभियंता श्री.शशिकांत पवार, कर निरिक्षक श्री.राजेश काळे, वरिष्ठ लिपिक श्री.ज्ञानदेव साळुंखे व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी श्री. किशोर तवरेज यांनी माहिती दिली की, मलकापूर शहराचे नगरभुमापन लवकरात लवकर होणेच्या दृष्टीने पुर्व तयारी बैठक अत्यंत आवश्यक असलेने मा.आ.पृथ्वीराज चव्हाण(बाबा), माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.आ.बाळासाहेब थोरात, महसुली मंत्री तसेच मा.आनंद रायते साहेब, अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक, भुमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे सुचनेप्रमाणे व नगरपरिषदेचे पदाधिकारी यांचे पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागलेले आहे. नगरभुमापनामुळे मलकापूर शहराची पत वाढणार असून, 1900 कोटी एवढ्या रकमेची पत बाजारामध्ये कायम स्वरुपी टिकून राहणार आहे. नगरपरिषदेने सर्व क्षेत्रात उत्कृष्ट काम केले असून, शहराचे नगरभुमापनाचे काम माझ्या देखरेखी खाली होणार असलेने याबाबत मला आनंद असलेचे मत व्यक्त केले. 

श्री.मनोहर शिंदे यांनी मत व्यक्त केले की, नगरपरिषदेने व पदाधिकाऱ्यांनी सातत्याने केलेल्या पाटपुराव्यामुळे आज हे यश प्राप्त झाले असून, मलकापूर शहरातील नागरिकांची पत यामुळे वाढणार आहे. मलकापूर शहराचा सिटी सर्व्हे होणार असलेने शहरातील सर्व 7/12 व मिळकती यांची वैयक्तिक स्तरावर मोजणी होऊन कागदपत्रांच्या आधारे नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार असलेने या माध्यमातून गुंठेवारीचे नियमितीकरण होणार आहे व 7/12 कमी होऊन प्रॉपर्टी कार्ड व प्रत्येकाच्या हिस्साचा वेगळा फाळणी नकाशा उपलब्ध होणार आहे. तसेच गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल, शेतकरी, छोटे उद्योग व्यवसायिक, नोकरदार यांना त्यांच्या वैयक्तिक व वित्तीय कामासाठी उपयोग होणार व त्यामुळे गावठांणचे क्षेत्र वाढणार आहे. नगरभुमापन करताना या कामासाठी येणारे अधिकारी व कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आवाहन उपनगराध्यक्ष श्री.मनोहर शिंदे यांनी केले.