शक्ती मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी कडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक , ढेबेवाडी पोलिसात गुन्हा दाखल.


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
तळमावले (ता.पाटण) येथील शक्ती मल्टीपर्पज को ऑपरेटीव्ह सोसायटीने महिलांची फसवणूक केल्याचा गुन्हा ढेबेवाडी पोलीसांत दाखल झाल्याने विभागात खळबळ माजली आहे. भांबुचीवाडी (भोसगाव) येथील ३३ महिलांनी संस्थेविरोधात तक्रार दिल्याने संस्थेचे चेअरमन आणि संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संस्थेने महिलांसह इतर गुंतवणूकदार यांच्या कडून जास्त परतावा देण्याचे अमीष दाखवून पैसे जमा केले. मात्र त्याची मुद्दल अथवा जादा परताव्याची रक्कम न देता गाशा गुंडाळल्याने ठेवीदार अडचणीत सापडले आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की तळमावले येथील मुख्य बाजारपेठेत पाच वर्षांपूर्वी शक्ती मल्टीपर्रपज को ऑपरेटीव सोसायटी या नावाने सहकार तत्वावर चालणारी संस्था कार्यरत होती. प्रारंभी या संस्थेने जादा परतावा देण्याचे अमीष दाखवून विभागासह पाटण तालुक्यातून मोठी रक्कम जमा केली. त्या गुंतवणूकीची मुदत संपल्यानंतर संस्थेकडे ठेवीदारांनी रक्कम मागणी करण्यास सुरूवात केली. मात्र गुंतवणूकदारांना त्यांची मुद्दल अथवा व्याजाची रक्कम न देताच काही दिवसांतच संस्थेने गाशा गुंडाळला. गुंतवणूकदारांनी वेळोवेळी परताव्याची रक्कम मागणी केली मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने संस्थेने फसवणूक केल्याची गुंतवणूकदारांची खात्री पटल्याने भांबुचीवाडी (भोसगाव) येथील ३३ महिलांनी सोसायटीचे चेअरमन आणि संचालक यांच्या विरोधात ढेबेवाडी पोलीसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन तलबार करत आहेत. ढेबेवाडी विभागातील गुंतवणूकदारांनी शक्ती मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. या संस्थेमध्ये गुंतवणूक केली असेल तसेच ज्या लोकांच्या संस्थेकडून फसवणूक झालेली असेल अशा लोकांनी तात्काळ ढेबेवाडी पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन ढेबेवाडी पोलिसांनी केले आहे.