पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी म्हणजे नाविन्यपूर्ण उपक्रमांची खाणचं म्हटले तर वावगे ठरणार नाही. येथील युवकांनी पक्षांच्या संवर्धनासाठी पक्षांची भोजनालये बनवली आहेत. तेलाच्या रिकाम्या डब्यांपासून बनविलेली भोजनालये गावातील घरांसमोर आणि झाडांवर बसवलेली आहेत. यामध्ये चारा पाण्याची व्यवस्था केल्याने पक्षांचाही मुक्त संचार लक्षवेधी ठरला आहे. यासाठी ग्रामपंचायतीनेही सहकार्य केल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विविध शासकीय उपक्रम व स्पर्धांमधून सहभाग घेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत नावलौकिक मिळविलेल्या मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने गेल्या वीस वर्षात विविध पातळ्यांवरील साठ पुरस्कार पटकावले आहेत.लोकसहभागातून अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणाऱ्या मान्याचीवाडीला भेट देण्यासाठी राज्यभरातून अधिकारी, पदाधिकारी, गावकारभारी, विद्यार्थी येत असतात.आता तेथील उपक्रमात आणखी एक भर पडली आहे.
शासनाच्या पर्यावरण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या 'माझी वसुंधरा'अभियानांतर्गत गावातील युवकांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विशेष पुढाकार घेत तेलाच्या रिकाम्या डब्यांपासून पक्षांसाठी आकर्षक भोजनालये बनवली आहेत.गावातील प्रत्येक घरांसमोर तसेच ठिकठिकाणी झाडांवर बसवलेली ही भोजनालये आणि त्यात पक्षांचा मुक्त संचार सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.यु ट्युबवर अशा प्रकारे बनवलेली पक्षांची घरटी पाहून ही संकल्पना पुढे आली.
त्यासाठी युवकांनी पत्र्याचे रिकामे चौकोनी डबे गोळा केले.ते कापून पक्षांसाठी आकर्षक भोजनालये साकारली. घरोघरी त्याचे वाटप करण्यात आले असून त्यात अन्न-पाणी ठेवण्याची जबाबदारी त्या त्या कुटुंबांवर सोपविण्यात आलेली आहे.पक्षांसाठी बनविलेल्या भोजनालयांच्या वाटप प्रसंगी सरपंच रवींद्र माने,उपसरपंच अधिकराव माने,सदस्या पूनम माने,लता आसळकर,संगीता माने,सुजाता माने,रामचंद्र पाचूपते,ग्रामसेवक प्रसाद यादव,तंटामुक्तीचे अध्यक्ष दादासाहेब माने,पोलीस पाटील विकास माने,सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल माने,दूध संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव माने,उत्तमराव माने,दिलीप गुंजाळकर आदींसह ग्रामस्थ,पदाधिकारी उपस्थित होते.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागीय पातळीवरील परीक्षणासाठी उपआयुक्त टीमने मान्याचीवाडीची नुकतीच तपासणी केली,त्यावेळी पक्षाच्या भोजनालयांचीही त्यांनी आवर्जून पहाणी करून कौतुक केले.
___________________________________
''पर्यावरणाचा समतोल ढासळत चालल्याने पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.निसर्ग साखळीतील या महत्वाच्या घटकाचे संरक्षण होण्यासाठी भोजनालयाची संकल्पना खूपच उपयुक्त ठरताना दिसते आहे''.
(सरपंच ग्रा.पं. मान्याचीवाडी)
___________________________________