विभागीय स्पर्धेसाठी मान्याचीवाडीतील कामांची पाहणी, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत उपक्रमांची समितीने घेतली माहिती.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेत वीस वर्षांपासून सातत्य ठेवलेल्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची विभागीय स्पर्धेसाठी तपासणी करण्यात आली. गावाने राबविलेल्या विविध उपक्रमांची या समितीने पाहणी करून समाधान व्यक्त केले. 

   मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने राज्य शासनाचे आणि केंद्रशासनाचे विविध उपक्रम राबवत आतापर्यंत साठ पुरस्कार पटकावले आहेत. वीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेत सातत्य ठेवत अन्य गावांसमोर आदर्श ठेवला आहे. यावर्षी सातारा जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळविल्यानंतर आता विभागस्तरासाठी स्पर्धा होत आहे.     

   या स्पर्धेच्या तपासणीसाठी पुणे विभागाचे उपायुक्त(विकास) विजय मुळीक, सहाय्यक आयुक्त (विकास) सीमा जगताप, माहीती विभागाचे उपसंचालक पुरुषोत्तम पाटोदकर, कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रकाशकुमार बोबले आदिंनी गावातील उपक्रमांंची माहिती घेतली. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सरपंच रवींद्र माने, उपसरपंच अधिकराव माने, ग्रामसेवक प्रसाद यादव आदिंनी समितीच्या सदस्यांना अभियान कालावधीत केलेल्या कामांसह नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. 

   यामध्ये गावाची स्वच्छता, पाणीव्यवस्थापन, करवसुली, घनकचरा व्यवस्थापन, शाळा व्यवस्थापन, लोकसहभाग, श्रमदान, गटार, अंतर्गत रस्ते, जलसंधारण, शौचालय व्यवस्थापन आदि बाबींची तपासणी केली. स्वागत दिलीप गुंजाळकर यांनी केले. प्रास्ताविक सरपंच रवींद्र माने यांनी केले आभार ग्रामसेवक प्रसाद यादव यांनी मानले.