गृहराज्य मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या जनता दरबारला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद.

 

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

राज्याचे गृहराज्यमंत्री आणि पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी ना. शंभूराज देसाई यांच्या मंत्रिपदाच्या कालावधीतील पहिल्याच जनता दरबारात जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय शासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत झालेल्या जनता दरबारात तब्बल 353 लेखी निवेदने दाखल झाली. यापैकी बहुतांशी निवेदनांचा जागेवरच निपटारा झाल्याने नागरिकांनी या दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.दरम्यान सदर तक्रारी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टॉप प्रायोरिटीने दखल घेण्याचे अधिकाऱ्यांना आदेश मंत्री ना. देसाई यांनी देऊन एक महिन्याच्या आत सदर निवेदनांची कार्यवाही पूर्ण करावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा ही मंत्री देसाई यांनी शासकीय विभागांना दिला.

             यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई,जिल्हाधिकारी शेखर सिंह,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,पोलीस अधीक्षक अजय बन्सल,पाटण चे उपविभागीय अधिकारी सुनील गाडे,उप विभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील ,तहसीलदार रमेश पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,सुरेश पानस्कर,भरत साळूंखे,अभिजित पाटील,बबनराव भिसे,विजयराव जंबुरे,बशीर खोंदू,बबनराव माळी,सुरेश जाधव, तसेच जिल्ह्यातील आरोग्य,बांधकाम,शिक्षण,वन,परिवहन तसेच विविध शासकीय विभागातील जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

                पाटण तालुक्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जनता दरबार उपक्रमास नागरिकांमधून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे.कारण विविध शासकीय पातळीवर प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांची जनता दरबारात जागेवरच सोडवणूक होत असल्याने या दरबाराला तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांमधून अनन्य साधारण महत्व आहे. दरम्यान कोविड काळामुळे दोन वर्षे पाटण तालुक्यतील जनता दरबार रखडला होता.मात्र मंगळवारी पुन्हा पाटण तालुक्यातील मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या मंत्री पदाच्या काळातील पहिला आणि आजपर्यंतचा पाचवा जनता दरबार पाटण येथे तहसीलदार कार्यालय प्रांगणात संपन्न झाला.

               जिल्हास्तरीय विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या समवेत पार पडलेल्या या जनता दरबारात विविध अशा एकूण 353 लेखी निवेदने दरबारात दाखल झाल्या. यापैकी काही निवेदनांचा जागेवरच निपटारा करण्यात आला तर काही निवेदनां संदर्भात संबंधीत अधिकार्यांनी एक महिन्याच्या आत कार्यवाही करून सदर समस्या सोडविली असल्याची माहिती मला द्यावी असे आदेश देऊन पुरवठा विभागसंदर्भात सर्वाधिक निवेदने प्राप्त झाले असून या संदर्भात स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे ही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.दरम्यान बहुतांशी निवेदनांचा निपटारा जागेवरच करणेत यश मिळाले.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

__________________________________

जनता दरबार मुळे एसटी होणार सुरू..!

विविध कारणांमुळे पाटण तालुक्यातील जळव मणदुरे पाटण ही एसटी सेवा बंद असल्याने परिसरातील शालेय विद्यार्थ्यी आणि ग्रामस्थांचे हाल होत असल्याने काही शालेय विद्यार्थिनींनी जनता दरबारात मंत्री देसाई यांचेकडे गाऱ्हाणे मांडताच मंत्री देसाई यांनी जिल्हा नियंत्रक सातारा यांना या मार्गावरील एसटी तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले.यावेळी उद्या बुधवार पासून या मार्गावरील एस.टी. सुरू होईल अशी माहिती विभाग नियंत्रक यांनी दरबारात दिली.

__________________________________

अन शेवटचा माणूस जाईपर्यंत मंत्री देसाई थांबले..!

जनता दरबार कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात लेखी निवेदने दाखल झाले. जो पर्यंत जनता दरबारात निवेदने घेऊन आलेला शेवटचा माणूस जात नाही तो पर्यंत मी कुठेही जाणार नाही सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन त्याचे समाधान होईपर्यंत आपण इथेच थांबणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.आणि खरोखरच मंत्री देसाई शेवटच्या नागरिकाचे समाधान होईपर्यंत तब्बल सहा तास एकाच ठिकाणी या जनता दरबारात थांबले आणि नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले.

__________________________________

एक महिन्यात पूर्ण करा.. अन्यथा...!

जनता दरबारात मी मंत्री म्हणून जनतेच्या निवेदनांवर शेरे दिले आहे. ज्या विभागातील अधिकाऱ्यांच्या संबंधित निवेदन असेल त्या अधिकाऱ्यांनी टॉप प्रायोरिटी म्हणून सदर बाबीची एक महिन्याच्या आत कार्यवाही पूर्ण करावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी जनता दरबारात दिला.

__________________________________