...तर जागतिक महिला दिनी निदर्शने करण्याचा इशारा
पाटण येथील महिला अत्याचारातील दोषींवर कडक कारवाई व आंदोलनाचा इशारा तहसीलदार पाटण,व पोलीस निरीक्षक पाटण यांना निवेदना द्वारे देतांना सिताई फौंडेशनच्या अध्यक्षा कविता कचरे, प्रतिभा शेडगे,शालन मोरे व इतर.
डिसेंबरमध्ये 2021मध्ये रूवले ता.पाटण येथे अल्पवयीन बालिकेवर अत्याचार आणि तिची हत्या अशी संतापजनक घटना घडली त्या आरोपींवर तातडीने कठोर कारवाई होणे अपेक्षित असतांना आज अखेर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही.तोवर रामापुर ( पाटण )येथे मतीमंद मुलीवरील अत्याचाराची घटना घडल्याने सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली आहे व गृहराज्य मंत्र्यांच्या तालुक्यात महिला असुरक्षित आहेत असे चित्र निर्माण झाले आहे. महिलांनी कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये याची दक्षता घ्या असा इशारा सिताई महिला फौंडेशनच्या कविता कचरे यांनी दिला आहे.
राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभुराज देसाई, तहसिलदार पाटण व पाटण तालुका पोलीस निरीक्षक चौखंडे याना दिलेल्या निवेदनात फौंडेशनच्या महिला सदस्यांनी म्हटले आहे की नुकतीच ( रामापुर) पाटण येथे एका मतीमंद मुलीवर कांही नराधमांनी अत्याचार केल्याचा अमानवी प्रकार उघडकीस आला आहे, त्यात एका महिलेचा समा्वेश आहे ही स्री जातीला काळीमा फासणारी क्लेशदायक घटना आहे.त्यात आठ नराधमांना अटक झाली आहे, यात आणखी कांही नराधमांचा समावेश असू शकतो त्याचा कसून तपास होण्याची गरज आहे.
डिसे.2021 मध्ये रूवले ता.पाटण येथे घडलेल्या बालिका अत्याचार व हत्येचा आक्रोश शमलेला नाही तोवर ही दुसरी घटना घडली आहे. याचा अर्थ राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या तालुक्यातच महिला असुरक्षित आहेत असा होतो. महिलांच्या फार मोठ्या अपेक्षा गृह खात्याकडून असतांनाच अशा घटना वारंवार घडत असतील तर महिलांचा या खात्यावरील विश्वास संपेल.
पहिल्या घटनेतील आरोपींवर जरब बसेल अशी कठोर कारवाई तातडीने झाली असती तर अशा समाजकंटकांनाही जरब बसली असती.अशा नराधमांची तोंडाला काळे फासून धिंड काढली पाहिजे तरच भविष्यात अशा घटना रोखता येतील, आणि या दोन्ही घटनांतील आरोपींना जबर शिक्षा होईल अशी कारवाई व्हावी अन्यथा येत्या जागतिक महिला दिनी पाटण बंद करून तहसीलदार कार्यालया समोर निदर्शने करून महिला रस्त्यावर उतरतील असा इशारा निवेदनात दिला आहे.
निवेदनावर सिताई फौंडेशनच्या अध्यक्षा कविता कचरे,सचिव प्रतिभा राहूल शेडगे, व शालन पांडुरंग मोरे ( मोरगिरी.) आदिंच्या सह्या आहेत.