‘न अनुभवलेली वारी’ या हस्तलिखिताचे प्रकाशन


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
माघी शुध्द जया एकादशीचे औचित्य साधून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड होल्डर युवा चित्रकार व पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी तयार केलेल्या ‘न अनुभवलेली वारी’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.गुरुवर्य रामदास महाराज आरेवाडीकर, महाराष्ट्र राज्य वारकरी मंचाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.मधुकर महाराज आगाशिवनगरकर, संतयोगी हरिबाबा दिंडी सोहळा सांगवड ते पंढरपूर चे दिंडीप्रमुख ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज सांगवडकर, वारकरी संघाचे कराड तालुका संपर्क प्रमुख ह.भ.प.विलास महाराज चचेगांवकर, वारकरी युवा मंच चे तालुका संघटक ह.भ.प.मोहन आण्णा आगाशिवनगरकर, गायनाचार्य प्रकाश लोहार चचेगांवकर, आकाश सोरटे, संतोष खालकर, निलेश शिंदे व अन्य मान्यवर यांनी या हस्तलिखिताचे प्रकाशन केले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली 2 वर्षे वारी झाली नाही. या वारीचे वृत्तांकन विविध वृत्तपत्रांनी सुंदर रीत्या केले होते. या कात्रणांचे सुंदर संकलन डाॅ. संदीप डाकवे यांनी केले आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या पादुकांचे प्रस्थान ते आषाढी एकादशीपर्यंतचा प्रवास यात आहे. हे हस्तलिखीत पाहून आपण वारीचा प्रवास जाणून घेवू शकतो. त्यामुळेच या हस्तलिखीताचे नाव ‘न अनुभवलेली वारी’ असे लिहले आहे. या हस्तलिखितात पायी वारी असती तर आजचा मुक्काम, शब्दवारी, बोल दिंडीकऱ्यांचे, विविध संतांच्या पालख्यांचे प्रातिनिधिक सोहळे, आय विटनेस अंतर्गत जुने फोटो, मनातली वारी, ओव्या आणि तिचे निरुपण इ.चे सुंदर संकलन यात आहे.

आतापर्यंत डाॅ.डाकवे यांनी विविध क्षेत्रातील कलावंत, दादा, बापूजी, कर्मवीर, जलयुक्त शिवार अभियान, लेक वाचवा, स्वच्छ भारत अभियान, कर्नल संतोष महाडीक इ. हस्तलिखिते तयार केली आहेत.

गत काही वर्षापासून पंढरपूर वाखरी येथील उभ्या रिंगणाचा अमृतमय क्षण बघितल्यामुळे अशा पध्दतीचे वारीवर काहीतरी करावे, अशी प्रेरणा मिळाल्याचे डाॅ.संदीप डाकवे यांनी सांगितले. या हस्तलिखितामुळे अनेकांना गोड वारीचा अनुभव घेता येईल अशी प्रतिक्रिया ह.भ.प.रामदास देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

___________________________________

डाॅ.संदीप डाकवेंनी वारीच्या अनुषंगाने राबवलेले उपक्रम:
टी शर्टवर विठूरायाचे चित्र
मोरपिसावर संत तुकारामांचे चित्र
शब्दात विठ्ठलाच्या चित्रांचे रेखाटन
16 फुट बाय 2 फुट आकाराच्या पोस्टरातून वारकऱ्यांना शुभेच्छा
घराच्या भिंतीवर 14 फूट बाय 6 फूट आकारात वारीचे भव्यदिव्य चित्र
अक्षर अभंग वारी उपक्रम
___________________________________