सेलिब्रिटींकडून ‘स्पंदन’ ट्रस्टचे कौतुक


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
स्टार प्रवाह या मालिकेतील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत अशोक यांची भूमिका साकारणारे अभिनेते संतोष पाटील आणि सुनील यांची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज काळे या दोन उमद्या कलावंतांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या अहवालाचे अवलोकन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा देत भविष्यात ट्रस्टच्या सामाजिक कार्यात सहभाग घ्यायला आवडेल असेही सांगितले. दरम्यान, परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचे किशोर काळोखे यांनीही ट्रस्टला शुभेच्छा दिल्या. सामाजिक जाणिवेचे भान जपलेल्या ट्रस्टने नावीण्यपूर्ण उपक्रम राबवत अनेकांना सहकार्य केले आहे. ट्रस्टच्या उपकमांना खा.संभाजीराजे छत्रपती, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड, गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई, खा.श्रीनिवास पाटील, कलाशिक्षक बाळासाहेब कचरे व अन्य मान्यवर यांनी संदेशाव्दारे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विविध सेलिब्रिटींनी व्हिडीओ शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

एकंदरित, ट्रस्टच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अभिनेते संतोष पाटील आणि पंकज काळे या सेलिब्रिटींनी ट्रस्टला शुभेच्छा दिल्यामुळे काम करण्यास आणखी प्रोत्साहन मिळाले आहे असे मत ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी सांगितले आहे.