शासनाने लावलेल्या निर्बंधांची राज्यात कडक अंमलबजावणी करा : गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोलीस विभागाला सूचना


सातारा,दि.9 (जिमाका) : राज्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लावले आहेत. त्या निर्बंधांची राज्यासह जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस विभागाला केल्या.

 गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर सातारा पोलीस मुख्यालयातून व्हिसीद्वारे संवाद साधाला. यावेळी गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंह, कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, नाशिक विभागाचे उप महानिरीक्षक बी.जे. शेखर, गडचिरोलीचे उपमहानिरीक्षक संदिप पाटील, अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, नागपूरचे पोलीस महानिरीक्षक चेरींग दौडजे, नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्यासह सातारचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे उपस्थित होते. 

 राज्य शासनाने रात्रीची संचार बंदी लागू केलेली आहे. विनाकारण कोणी रस्त्यावर फिरत असल्यास त्याच्यावर कारवाई करावी, अशा सूचना करुन श्री. देसाई म्हणाले, शासनाने लावलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी कृती आराखडा तयार करा . जे कुणी नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी असे ही त्यांनी सांगितले. 



 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून जनतेनेही कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करुन सहकार्य करावे. अत्यावश्यक काम असल्यासच घराच्या बाहेर पडावे तसेच अनावश्यक गर्दी टाळावी. ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक पहिली लशीची मात्रा घेतली आहे, परंतु अद्यापपर्यंत दुसरी मात्रा घेतली नाही, अशा नागरिकांनी दुसरी मात्रा त्वरीत घ्यावी, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी केले.

 या बैठकीनंतर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राज्य शासनाने घातलेल्या निर्बंधांची जिल्ह्यातही कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी केल्या.