मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे: पृथ्वीराज चव्हाण


 पणजी : भाजप सरकारला कडाडून लक्ष्य करताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सांगितले की, भाजपने देशाच्या आणि राज्याच्या जनतेची लूट सुरू केली आहे. चव्हाण यांनी आज पणजीत पत्रकार परिषद घेवून महागाईवर मात करायची असेल तर भाजपचा पराभव करा, असे आवाहन गोव्यातील जनतेस केले आहे.

गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव, काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा, महिला अध्यक्ष बीना नाईक, सुनिल कवठणकर आणि नौशाद चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

 यावेळी काँग्रेसने महागाईवरील पुस्तिकेचे प्रकाशन करीत लोकार्पण केले. या पुस्तिकेचे प्रकाशन देशात एकाचवेळी पाच राज्यातील 7 ठिकाणी करण्यात आले. यामध्ये गोव्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, लखनऊ येथे रणदिप सुरजेवाला, चंदीगड येथे छत्तीसगड चे मुख्यमंत्री भूपेश बघेल, जलंधर येथे दिग्विजय सिंह, डेहराडून येथून सचिन पायलट, मेरठ येथून हार्दिक पटेल आदींनी महागाई वरील पुस्तिकेचे प्रकाशन करीत मोदी सरकारवर टीका केली.

 पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,नोटबंदी, तसेच वस्तू आणि सेवाकर (GST) लागू करणे हे मोदी सरकारची मोठी चूक होती ‘‘सध्या देशाची आर्थिक परिस्थिती खुपच वाईट आहे. पण मोदी सरकार ती फुगवून दाखवत आहे.’’ मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे आणि सद्याची स्थिती खुपच गंभीर आहे. या वर्षाच्या अंदाजपत्रकात मोदी कसे आकडे दाखवतात त्याच्यावर देशातील लोकांची नजर आहे.

गोव्यामध्ये मागील वेळी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळून सुद्धा कश्याप्रकारे जनतेचा जो कौल आहे त्याचा भाजपने अनादर केला गेला हे सर्वज्ञात आहे. “मला पुर्ण खात्री आहे की यावेळी मागील चुकीची पुनरावत्ती न होता काँग्रेसला बहुमत मिळणार आणि आम्ही स्थिर सरकार देणार. यंदा भाजपला आमदार पळवून सरकार स्थापन करण्याची संधी गोव्यातील जनता देणार नाही.’’ असेही श्री चव्हाण यावेळी म्हणाले.

“मोदी सरकारने महागाई वाढवून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या भावनांशी खेळ केला आहे. लोकांना त्रास दिला आहे. असे असताना, त्यांच्या भांडवलदार मित्रांचे उत्पन्न दिवसेंदिवस हजारो कोटींनी वाढत आहे.” असे चव्हाण म्हणाले.

“मोदी सरकार साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करत नाही. याचा परिणाम बाजारावर झाला आहे. प्रत्येक वस्तूचे भाव वाढत आहेत. पण मोदी अनेक करांच्या लुटलेल्या पैशातून पेट्रोल पंपावर आणि वर्तमानपत्रात आपल्याला जाहिराती दाखवण्यात व्यस्त आहेत.’’ मोदी सरकारने गेल्या सात वर्षात पेट्रोल आणि डिझेल मधून वसूल केलेल्या करातून 24 लाख कोटींची लूट केली आहे. एलजीपी गॅसपासून स्वयंपाकघरातील सर्व आवश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. 

श्री चव्हाण महागाईचे उदाहरण देत म्हणाले की, प्रति किलो चहाच्या पाकिटांची किंमत 2014 साली 130 ते 140 रुपये होती, जी आता 400 ते 500 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात 2014 मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 108 डॉलर होती, तरीही काँग्रेस सरकार कमी किमतीत म्हणजे रु 70 च्या घरात पेट्रोल देण्यात यशस्वी झाले. “आता कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 73 डॉलरवर आले असूनही पेट्रोल ची शंभरी पार झालेलीच आहे. अजून कोणतेही दर केंद्र सरकारने कमी केलेले नाहीत. अश्या प्रत्येक घटकावर / वस्तूंवर अतिरिक्त कर लावून मोदी सरकार जनतेची लूट करत असल्याचे सिद्ध होते.’’

"मोदी सरकारने ऑनलाइन व्यवहारांना चालना दिली, परंतु आता एटीएममधून स्वतःचे पैसे काढण्यासाठी आपणाला अतिरिक्त चार्जेस द्यावे लागत आहेत." अशी खंतही यावेळी श्री चव्हाण यांनी व्यक्त केली. भाजप आणि महागाई देशासाठी घातक आहे, त्यामुळे त्यांना एकजुटीने पराभूत केले पाहिजे. असे आवाहन यावेळी श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.