मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबईतील ताडदेव परिसरातील कमला या २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आज सकाळीच भीषण आग लागली. या आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना उपचारासाठी इमारती शेजारी असणाऱ्या भाटीया रुग्णालयात (५), कस्तुरबा (१), नायर रुग्णालय (१) दाखल करण्यात आले आहे. मात्र आगीच्या या घटनेनंतर रिलायन्स, मसीना आणि वॉकहार्ट रुग्णालयांनी जखमींना रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिला होता. यावरुन संताप सुरू झाला.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करत या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. यानंतर जखमींना दाखल करण्यास नकार दिलेल्या रुग्णालयाच्या प्रशासनाला जाब विचारणार असून
त्यांच्याकडून सकारात्मक स्पष्टीकरण न मिळाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. या सर्व घडामोडीनंतर या रुग्णालयांनी जखमींना दाखल करून घेतले असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.
आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे कमला इमारतीला आग लागली.१८ व्या मजल्यावर आग लागल्याचे समजताच रहिवाशांनी तात्काळ इमारतीबाहेर धाव घेतली. त्यानंतर या आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सकाळी पावणे आठच्या सुमारास ही आग लेव्हल ३ ची असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आणि जवळपास दोन तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत या आगीत १८ व्या मजल्यावरील ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेत १५ जण जखमी झाले आहेत. हितेश मिस्त्री, मंजू बेन कंठारिया, पुरुषोत्तम चोपडेकर यांच्यासह इतर तिघांचा मृत्यू झाला आहे. तर हंसा चोक्सी, फाल्गुनी चोक्सी, धवल, यश चोक्सी, शुभांगी साळकर, दिलीप साळकर, ममता साळकर, तनिषा सावंत, अंकिता चौधरी, धनपत पंडित, गोपाळ चोपडेकर, स्नेहा चोपडेकर, वेदांगी चोपडेकर, मीना चव्हाण, प्रतिमा नाईक, कल्पना नाडकर्णी, स्मीता नाडकर्णी, रुदया चोपडेकर, मनीष सिंग, मंजू खन्ना अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या घटनेतील जखमींना भाटिया, नायर आणि कस्तुरबा रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी जाऊन दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करत रहिवाशांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत विचारपूस केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, भाटिया रुग्णालयात रूग्णांना भरती केले आहे. जवळच्या रुग्णालयात बेड्स रिकामे ठेवण्यास सांगितले आहे. बचावपथकाकडून कार्य सुरु असून या इमारतीतून लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. ज्या रुग्णालयांनी जखमींना दाखल करुन घेण्यास नकार दिला त्या रुग्णालयांच्या प्रशासनाला जाब विचारणार असून त्यांच्याकडून योग्य स्पष्टीकरण न मिळाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी जखमींना उपचारासाठी दाखल करायला नकार देणार्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत्याही रुग्णालयाला नकार देता येणार नाही. माझे सचिवांसोबत बोलणे झाले आहे. सरकार तसे काही होऊ देणार नाही.
भाटिया रुग्णालयाच्या डॉ. टीना यांनी सांगितले की, भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या १५ जखमींपैकी १२ जणांना जनरल बर्न वॉर्डमध्ये, तर ३ जणांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. नायर रुग्णालयाचे डॉ. काळे यांनी सांगितले की, 4 जखमी रुग्णांना रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यापैकी २ जणांचा मृत्यू झाला.तर दोघांची प्रकृती स्थिर आहे.कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक रहिवाश्यांनी सांगितले की, आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीची लाईट गेली होती. बाहेर पाहिले तर मोठा धूर दिसून येत होता आणि आग लागल्याची माहिती मिळताच सगळेजण इमारतीच्या बाहेर आले. प्रत्येक मजल्यावर सहा घरे आहेत.१६० ते १८० च्या आसपास इमारतीत घरे आहेत. ज्या मजल्यावर आग लागली तिथे साधारणपणे २० ते २२ रहिवासी राहत होते.
या घटनेनंतर राज्य सरकारच्यावतीने मृताच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट देत जाहीर केली. वास्तविक पाहता स्थानिक घटनांशी तसा केंद्राचा संबंध येत नसतो. मात्र मुंबईत होणाऱ्या महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्रातील भाजप सरकारने पंतप्रधान साहाय्यता निधीतून या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये तर जखमींच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे.