सातारा दि. 20 (जिमाका) : पाटण विधानसभा मतदारसंघासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध केला आहे. मतदार संघातील प्रलंबित कामे त्वरीत पूर्ण करावीत विशेषत: रस्त्यांची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज पाटण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचा आढावा श्री. देसाई यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सार्वजनिक बांधकाम विभाग (पश्चिम) संजय सोनवणे यांच्यासह महसूल, जिल्हा परिषदेकडील संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाटण विधानसभा मतदार संघातील ज्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत त्या कामांचे उपयोगीता प्रमाणपत्र वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात यावे, अशा सूचना करुन श्री. देसाई म्हणाले जी कामे मंजूर आहेत त्या कामांची लवकरात लवकर तांत्रिक मान्यता घ्यावी. जी मंजूर व अपूर्ण कामे आहेत ती येत्या फेब्रुवारी अखेर पूर्ण करुन याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या.