मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मुंबईतील कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचे बोलले जात असताना आता मुंबईत म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण आढळला आहे. एका ७० वर्षीय वृद्धाला कोरोनावर मात केल्यानंतर म्युकर मायकोसिसची लागण झाली असल्याची माहिती हाती आली आहे.
या रुग्णाचा ५ जानेवारीला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.त्याला अशक्तपणा जाणवत होता. तसेच त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण थेट ५३२ वर पोहोचले होते. त्यामुळे या रुग्णाला १२ जानेवारीला मुंबई सेंट्रल येथील वॉक्हार्ड्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातील डॉक्टरांनी आवश्यक सर्व चाचण्या तातडीने केल्या.तेव्हा रुग्ण स्टिरॉइड्सवर नव्हता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रुग्णावर उपचार सुरु असताना १४ जानेवारीला रुग्णाने आपला गालात दुखत असल्याची तक्रार डॉक्टरांकडे केली. डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केली तेव्हा त्या रुग्णाच्या गालाला सूज आली होती. डॉक्टरांनी तातडीने एमआयआर केला. पण त्यामध्ये हाडांची कोणत्याही प्रकारे झीज झालेली नाही, असे निष्पन्न झाले आहे. सुजलेल्या भागातील काही नमुने प्रयोगशाळेत तपासासाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये रुग्णाच्या गालावर काळ्या बुरशीची प्रचंड वाढ झाल्याचे उघड झाले आहे.