कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कराड–ढेबेवाडी मार्गावर असलेल्या तारुखजवळच्या बामणवाडी या छोटयाशा पण आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावामध्ये नुकताच तालुक्यातील सर्वात मोठा मंदिर जिर्णोधार सोहळा थाटामाटात पार पडला.तब्बल तीन दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली.त्याचप्रमाणे या तिन्ही दिवशी गावातील सर्व ग्रामस्थांसाठी आणि परिसरातील भाविकांसाठी खास नाश्ता आणि भोजनाची सोय करण्यात आली होती.
या गावातील ग्रामदैवत असलेल्या लक्ष्मी देवीच्या मंदिराचा नुकताच जिर्णोधार करण्यात आला आहे. त्यानिमित्त मूर्तीची सवाद्य मिरवणूक,मंदिराचे वास्तुपूजन ,मूर्तीला धान्यवास,मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण,तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने प्रवचने आणि हरिपाठ आदि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.पहिल्या दिवशी निघालेली मूर्ती व कलशाची सवाद्य मिरवणूक सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली.
कोळेवाडीतील गणेश मंदिरापासून निघालेली मिरवणूक कुसूर आणि तारुखमार्गे बामणवाडीत पोहचली.या मिरवणुकीत कोरोनाचे नियम पाळत पारंपारिक वाद्य असलेल्या मावळच्या प्रसिद्ध ढोल ताशासह नृत्य करणारे अश्व आणि सनई चौघड्यांचा समावेश होता.या कार्यक्रमात गावातील माहेरवाशिनींची साडी व खणा नारळाने ओटी भरण्यात आली तर उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.हा भव्य दिव्य सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ व गणेश नवरात्र मंडळ आणि शिवशंभो मित्र मंडळ मुंबईच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.