सातारा तालुक्यातील अंगापूर येथे दोन पूलासाठी 2 कोटी 15 लाख

खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नाला यश ; वाहतूक होणार सुलभ

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
     खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन व अंगापूर तर्फ तारगाव येथील पूलाच्या बांधकामासाठी 2 कोटी 15 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या पूलामुळे परिसरातील नागरिकांसह कोरेगाव व कराड तालुक्याला जोडणारी वाहतूक सुलभ व सोयीची होण्यास मदत मिळणार आहे.

    रा.मा.140 ते ब्रम्हपुरी, अंगापूर, निगडी, कामेरी, फत्यापूर, देशमुखनगर, जावळवाडी, वेणेगाव, कोपर्डे, कालगाव मार्गावरील अंगापूर वंदन येथील पूलासाठी 1 कोटी 5 लाख आणि अंगापूर वंदन व अंगापूर तर्फ तारगाव या दोन्ही गावच्या ओढ्यावरील पूलासाठी 1 कोटी 10 लाखाची निधी राज्य शासनाच्‍या डिसेंबर 2021 च्या पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर झाला आहे. खा.श्रीनिवास पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुरावामुळे यास यश आले आहे.

     दोन्ही अंगापूर ही गावे विभागाच्या दृष्टीने हे महत्वाची गावे असून या ठिकाणी मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. त्यामुळे येथे आठवडा बाजारासाठी येणारे व्यापारी व ग्राहक, परिसरातून येणा-या नागरिकांची संख्या मोठी आहे. तसेच या मार्गावरून वाहतूकीचे प्रमाणही मोठे आहे. सध्या याठिकाणी कमी उंचीचे व अरूंद पूल असल्याने या मार्गावरून प्रवास करणारे वाहनधारक व प्रवाशांची गैरसोय होत आहे. रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम प्रगतीत असताना तात्पुरत्या स्वरूपातील सदर पूलामुळे दळणवळणाच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे याठिकाणी जादा उंचीचा व रूंद पूल व्हावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार खा.श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला होता. खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या प्रयत्नामुळे या दोन पूलासाठी पुरवणी अर्थसंकल्पात भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. या पूलांचे काम मार्गी लागल्यानंतर सातारा तालुक्यासह कोरेगाव व कराड तालुक्याला जोडणा-या मार्गावरील वाहतूक सुलभ व सोयीची होणार आहे. यासाठी आ.शशिकांत शिंदे, बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संजय मुनगिलवार, कार्यकारी अभियंता एस.पी.दराडे, उप अभियंता आर.टी.अहिरे, शाखा अभियंता आर.बी.शिंदे यांचे सहकार्य लाभले.