राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील मरळी दाैलतनगर येथील बंगल्यामध्ये मंगळवारी रात्री आठ च्या सुमारास अचानक बिबट्या ची एन्ट्री झाली. अचानक झालेल्या या बिबट्याच्या एन्ट्री ने उपस्थित सर्वांचीच तारांबळ उडाली.
या वेळी ना.शंभूराज देसाई हे बंगल्यामध्ये काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत बसले होते. या वेळी अचानक बंगल्याच्या आवारात एका बिबट्याने प्रवेश केला . बंगल्याच्या आवारातील काही लोकांनी बिबट्याला पाहताच मोठ्याने आरडा ओरडा केला. हा आरडाओरडा ऐकून बिबट्याने बंगल्याच्या आवारातून धूम ठोकली.
ना. देसाई यांच्या बंगल्याच्या शेजारील लाॅनवरती बिबट्याचा वावर असताना गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई हे स्वतः यावेळी निवासस्थानी उपस्थीत होते. तसेच मरळी गावचे माजी सरपंच प्रविण पाटील यांच्यासह काही कार्यकर्ते निवासस्थानी चर्चा करत असताना बिबट्या शेजारील परिसरात आला होता. दाैलतनगर येथील ना. देसाई यांच्या निवासस्थानी आलेल्या बिबट्याच्या बातमीमुळे मरळी गावासह परिसरातील गावात घबराटीचे वातावरण आहे .
ना. देसाई यांच्या बंगल्यामध्ये बिबट्या ने केलेल्या एन्ट्री मुळे पाटण तालुक्यात सर्वत्र हीच चर्चा सुरू आहे. पाटण तालुक्यात मागील काही दिवसांपासून अनेक गावांमध्ये बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे पाटण तालुक्यात बिबट्याची दहशत पसरली आहे.