कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
औद्योगिक क्रांती, वाढत चाललेले शहरीकरण, लोकसंख्येची होत असलेली वाढ आणि होणारे प्रदूषण यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे भविष्यात मानवासह सजीवांवर होणा-या दुष्परिणामांकडे गांभीर्याने पाहून पर्यावरण संवर्धनासाठी सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली.
लोकसभेच्या नियम 193 नुसार जलवायु परिवर्तन चर्चेदरम्यान खा.श्रीनिवास पाटील यांनी वातावरणातील होत असलेले बदल व त्याचे सजीव सृष्टीवर होणारे परिणाम याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, औद्योगिक क्रांती, सर्वत्र वाढत चाललेले शहरीकरण, लोकसंख्येची झपाट्याने होत असलेली वाढ आणि होणारे प्रदूषण यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान वाढीमुळे आरोग्याच्या सुविधा निर्माण झाल्या. माणसाचे आयुष्य वाढले. लोकसंख्या प्रचंड वाढली आणि त्यामुळे जंगले, वन्यजीव व नैसर्गिक संसाधनावर आपण प्रचंड ताण देऊ लागलो आहोत. ही साधनसंपत्ती नष्ट होत चालली आहे. या सर्वांचा परिणाम भविष्यात मानवावर होणार असून त्यामुळे मानवाचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आयसीपीने दिलेला अहवाल आणि भारतासाठीची धोक्याची सूचना गंभीरपणे घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
निसर्ग हा सजीव आणि निर्जीव पदार्थापासून बनलेला असून हे दोन्ही एकमेकावर अवलंबून आहेत. जीवनाचा पाया असलेले जंगल हे अतिशय महत्त्वाचे आहे. सजीवांना प्राणवायू आणि अन्न देऊन जीवन जगवणारे वनेच आता आपणास वाढवणे आवश्यक आहे. मात्र आपण तीच वने तोडून आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत. पृथ्वीचे आणि प्रादेशिक वाढते तापमान कमी करण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे कार्बन डायऑक्साईड या वायूचे उत्सर्जन कमी करणे. कोळसा आधारित थर्मल सर्व वीज आणि प्रदूषण करणारे उद्योग त्वरित बंद करून अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत सोलर, पवनचक्की, हायड्रो बायो एनर्जी वाढवली गेली पाहिजे. आपली उद्योग आधारित अर्थव्यवस्था बदलून वन, वृक्ष, शेती ही निसर्ग आधारित अर्थव्यवस्था निर्माण करणे काळाची गरज आहे.
आपण आपले चैनीचे जीवन बदलून निसर्गाला पूरक अशी जीवनशैली अंगीकारली पाहिजे. अन्यथा जो निसर्ग आपल्याला जगवतो तोच निसर्ग आपल्याला मारणार आहे. आता वेळ कमी आहे, त्वरित पर्यावरण संवर्धनाकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
मी ज्या राज्यामध्ये राज्यपाल म्हणून काम केले आहे त्या सिक्कीम राज्यात दि.२५ जून या दिवशी ‘दहा मिनिटे वसुंधरेला’ ही संकल्पना राबवली जाते. तेथे प्रत्येक व्यक्ती एक रोप तरी लावतो आणि ते वाढवतो. त्यानुसार दरवर्षी एका व्यक्तीने एक रोप लावले तरी देशात सुमारे 130 कोटी लोकसंख्या आहे. त्याप्रमाणे 130 कोटी झाडे लागतील. आपल्या जीवनामध्ये निदान 60 ते 70 वर्ष आयुष्य जगले तर कित्येक कोटी झाडे निर्माण होतील. पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन करणे अंत्यंत महत्वाचे आहे. नाहीतर निदान आपला देह ठेवल्यानंतर ज्वलना करीता चितेवर ठेवण्यासाठी सुद्धा लाकडे शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे नव्याने जर वृक्षांची वाढ केली नाही तर आपल्याला पुढे गंभीर संकट निर्माण होईल. त्यासाठी नव्या पिढीला निसर्गावर प्रेम करायला शिकवले पाहिजे. तसेच शैक्षणिक पाठ्यपुस्तकात त्याबद्दलची माहिती प्रकाशित करून जागृती घडवून आणली पाहिजे.