कोल्हापूरला खंडपीठ स्थापन करा खा.श्रीनिवास पाटील यांची केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचेकडे मागणी

कराड : कृष्णाकाठ वृत्तसेवा:

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे व्हावे अशी मागणी साता-याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे केली आहे.

   कोल्हापूर येथील सर्किट बेंचसाठी अनेक वर्षापासून मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर खा.श्रीनिवास पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेतली. यासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून ही आग्रही मागणी केली आहे.

   खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे स्थापन करावे अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठ कृती समितीने यासंदर्भात सर्किट बेंचच्या स्थापनेबाबत वारंवार पाठपुरावा केला आहे. हे सर्किट बेंच स्थापन झाल्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना याचा अधिक फायदा होणार आहे. या जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई उच्च न्यायालयाशी संबंधित कामासाठी मुंबईला जावे लागते. याकरिता सुमारे 350 ते 400 किलोमीटरहून अधिक प्रवास त्यांना करावा लागतो. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा अनावश्यक रित्या खर्च होत असतो. कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन झाल्यास शेजारील जिल्ह्यातील दोन कोटींहून अधिक लोकांना याचा फायदा होईल. त्यामुळे हे सर्किट बेंच स्थापन होणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केली. तसे निवेदन ना.किरेन रिजिजू यांना त्यांनी दिले आहे.