शिवसमर्थ दिवाळी अंकावर गुणवत्तेची मोहोर


तळमावले/वार्ताहर

अ‍ॅड.जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संपादित झालेल्या शिवसमर्थ दिवाळी अंक 2021 ला ‘स्वदेशी सन्मान पुरस्कार’ मिळाला आहे. हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिवसमर्थ दिवाळी अंकाला तृतीय क्रमांक मिळाला आहे. याचा स्वीकार अंकाचे उपसंपादक डाॅ.संदीप डाकवे, इंद्रजित कणसे व सुभेदार जगन्नाथ शिद्रुक यांनी केला. या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा शिवसमर्थ दिवाळी अंकावर गुणवत्तेची मोहोर उमटली आहे.

जीवन इंगळे, ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, सुप्रसिद्ध कवी व गीतकार हनुमंत चांदगुडे, प्रमोद झांबरे, प्रकाश सकुंडे, डाॅ. शिवाजी शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. पुरस्कार वितरणानंतर कवी हनुमंत चांदगुडे यांच्या अध्यक्षतेखाली बहारदार कवी संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या पुरस्काराचे संयोजन श्री.काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान तसेच स्वदेशी बचतगट सकुंडेमळा,यांनी केले होते.

यापूर्वी शिवसमर्थ च्या प्रथम दिवाळी अंकातील कथा इ.6 वी च्या बालभारतीच्या अभ्यासक्रमात घेतली आहे. सन 2010 मध्ये दिवाळी अंकावर दै.नवाकाळ मध्ये प्रथम पानावर अग्रलेख छापून आला होता. सन 2011 रोजी अक्षररंग यांच्या वतीने दिवाळी अंकाला राज्यस्तरीय दिवाळी अंक पुरस्कार मिळाला आहे. सन 2012 ते 2015 या कालावधीत आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्यावतीने उत्कृष्ट मांडणी पुरस्कार मिळाला आहे. तर गतवर्षी मराठी वृत्तपत्रलेखक संघाचा उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्काराने शिवसमर्थ अंकाचा गौरव झाला आहे.

याशिवाय ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत भाऊंची भूमिका साकारणारे कलावंत प्रशांत चौडप्पा, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत विशाखाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पुनम चांदोरकर, अभिनेत्री प्राजक्ता नवनाळे या सेलिब्रिटींसह अनेकांनी यंदाच्या दिवाळी अंकाचे कौतुक केले आहे. शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अ‍ॅड.जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित केला जात आहे. या दिवाळी अंकांत नामवंत साहित्यिकांबरोबरच नवोदित लेखक कवी यांच्या साहित्याचाही समावेश केला जातो. आर्थिक सेवा देत असताना साहित्यिक चळवळीत शिवसमर्थ संस्था व परिवार योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे.

या पुरस्काराबद्दल शिवसमर्थ चे सर्व स्तरांतून विशेष कौतुक होत आहे.