भरदिवसा घरफोडी केलेल्या चोरास ढेबेवाडी पोलिसांनी अवघ्या दोन तासातच केले गजा आड. मुद्देमालही जप्त.

ढेबेवाडी पोलिसांची दमदार कामगिरी.



कुंभारगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

कुंभारगाव ता पाटण येथून जवळच असणाऱ्या कळंत्रेवाडी (भैरवदरा) येथे बुधवार दि.15/12/2021 रोजी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान घरफोडीचा प्रकार घडला. तो अवघ्या दोन तासात ढेबेवाडी पोलिसांनी उघडकीस आणला या घरफोडी मध्ये आरोपीने १ लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. तो त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला.

      याबाबत ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. संतोष पवार यांनी सदर घटनेची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली. याबाबत माहिती देताना ते म्हणाले कळंत्रेवाडी (भैरवदरा) येथील रहिवाशी आनंदा सखाराम यादव यांनी तातडीने सदर चोरीची फिर्याद पोलिसात दिली. फिर्यादी आनंदा सखाराम यादव यांच्या पत्नी काल दुपारी घराच्या आतील दरवाजा बंद करून दळण दळण्यासाठी गावात गेल्या होत्या. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन आरोपी तुषार तानाजी यादव वय २४ वर्षे रा.कळंत्रेवाडी याने घराच्या माळ्यावरून जाऊन घरातील तिजोरीचा दरवाजा उघडून कपाटा मधील मंगळसूत्र,सव्वा तोळ्याची सोन्याची चैन, कानातील कुड्या व १३ हजार रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता. याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिल्यानंतर आम्ही फिर्यादीच्या घराची पाहणी केल्यानंतर तेथेच राहणाऱ्या तुषार तानाजी यादव याची हालचाल संशयास्पद वाटली त्यानंतर त्याच्या कडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यास पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीने चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर त्याला तातडीने अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

 त्याने चोरून नेलेला मुद्देमाल भैरवदरा वाटेवरील जागेत लपवून ठेवला होता मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, संशिताला आज पाटण येथील न्यायालयात उभे केले असता त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

   पोलीस उपअधिक्षक रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ढेबेवाडीचे स.पो.नि संतोष पवार व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून चोरट्यास अवघ्या दोन तासात अटक केली त्याच्याकडील चोरीचा मुद्देमाल जप्त केला. ढेबेवाडी पोलीस स्टेशनच्या या कामगिरीचे व त्यांच्या सर्व पोलीस कर्मचार्‍यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भरदिवसा घडलेल्या या घरफोडीचा तपास करण्यासाठी ढेबेवाडीचे स.पो.नि संतोष पवार, फौजदार एम. एस. तलबार पो.हवालदार संजय राक्षे, प्रशांत शेवाळे, संदेश लादे ज्ञानदेव मुळगावकर,पो. नाईक नवनाथ कुंभार यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. 

   या कामांमध्ये पोलीस पाटील प्रविण मोरे,अमित शिंदे,भगवान मत्रे यांनी पोलिसांना सहकार्य केले.