7 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून खून; नराधमाला पोलिसांनी केली तातडीने अटक

संतप्त ग्रामस्थांची गृहराज्यमंत्र्याकडे नराधमास फाशीच्या शिक्षेची मागणी.

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील रूवले – सुतारवाडी येथे ७ वर्षीय दुसरीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर नराधमाने बलात्कार करून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह ओढ्यामध्ये टाकून दिल्याचं समोर आलं आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील रवले-सुतारवाडी येथील पीडित मृत अल्पवयीन मुलगी बुधवारी २९ रोजी सायंकाळी बेपत्ता झाली होती. त्यांनतर घरातील नातेवाईकांसह गावातील युवकांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत मुलीचा शोध लागला नाही. यावेळी ढेबेवाडी पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली.

 घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडीचे एपीआय संतोष पवार यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपीला ताब्यात घेतले. संतोष थोरात असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी गावातील नथुराम सुतार यांनी घरावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता आरोपी त्या अल्पवयीन मुलीला घेवून गेल्याचे दिसून आल्यानंतर आरोपीने गुन्हा कबूल केला. त्यानंतर मुलीला ज्या ठिकाणी मारुन टाकले होते ते ठिकाण दाखवले.
गुरुवारी पहाटे २:३० वाजण्याच्या सुमारास रवले- सुतारवाडी येथे घटनेतील पीडित मृत मुलीच्या घरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर ओढ्यात तिचा मृतदेह आढळून आला.

घटनास्थळी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे किशोर धुमाळ, कराडचे डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली व पुढील तपासाबाबत मार्गदर्शन केले.
त्यानंतर दुपारी गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली व अल्पवयीन पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना घडलेली घटना दुर्दैवी असून संशयित नराधमास फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा दृष्टीने पोलीस तपास करून न्यायालयासमोर पुरावे सादर करतील, असे सांगितले.