येणके येथील तो बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद ; काही वेळातच दुसऱ्या बिबट्याचे दर्शन.

 


येनके | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

ऊस तोडणी मजुराच्या मुलाचा बळी घेतलेला येणके ता.कराड येथील तो बिबट्या तब्बल 10 / 11 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात ठेवलेल्या आमिषाला बळी पडून पिंजऱ्यात जेरबंद होऊन वनविभागाच्या प्रयत्नाला यश मिळाले व येणकेकरांनी सुटकेचा निश्वास सोडत समाधान व्यक्त केलं खर पण तासाभरातच त्या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने ते समाधान क्षणभंगुर ठरून त्या बिबट्यालाही पकडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

    15 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30वाजता येणके -किरपे-तांबवे रस्त्याने ऊस तोडणी साठी निघालेल्या ऊसतोडणी मजुराच्या टोळी तील पाच वर्षाच्या एका मुलावर हल्ला करून त्याचा बळी घेतला होता त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजून येणके ग्रामस्थांमध्ये बिबट्याची भीतीयुक्त दहशत निर्माण झाली होऊन वन विभागाच्या कार्यपद्धतीवर तिव्र नाराजी व्यक्त करून जनतेतून संताप व्यक्त केला जात होता.

                वरील घटनेनंतर येणके येथील तो बिबट्या पकडण्यासाठी वनविभागांने प्रयत्न सुरू करीत परिसरात 4 सापळे,तसेच ट्रँप कँमेरे लावून त्याच्या हालचालींवर नजर ठेवली होती. बिबट्याला अमिष म्हणून कांही सापळ्यात मांस, एकात शेळीचे कोकरू ठेवले होते.तब्बल दहा दिवसानंतर बळीराममास्तर यांच्या वस्तीजवळ कृष्णत गरूड यांच्या शेता नजिक बकरी ठेवलेल्या पिंजऱ्यात बिबट्या शनिवारी सकाळी अडकून जेरबंद झाला. बिबट्या सापळ्यात अडकल्याचे समजताच ग्रामस्थानी समाधान व्यक्त करून तो पाहण्या साठी एकच गर्दी केली तेंव्हा घटनास्थळी दाखल झालेल्या कराडचे वनपरिक्षेत्रअधिकारी तुषार नवले,मलकापूर वनपाल रमेश जाधवर,कोळे वनपाल बी.एस.कदम,वनरक्षक राठोड आदींनी बिबट्याचा सापळा कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहाय्याने दुसऱ्या गाडीत चढवून तातडीने ढेबेवाडी वनपरिक्षेत्राकडे रवाना झाले.

   साताऱ्याचे उपवन संरक्षक महादेव मोहिते, सहा वनसंरक्षक महेश झांजूर्णे,कराडचे वनक्षेत्रपाल तुषार नवले, पाटणचे वनक्षेत्रपाल एल.व्ही.पोतदार, वनपाल बाबुराव कदम,रमेश जाधवर,वनरक्षक राठोड,विजयनगर चेकनाका वनरक्षक भारत खटावकर, संतोष यादव,उत्तम पांढरे,अरूण साळुंखे आदींनी याकामी परिश्रम घेतले आहेत.

     यानंतर तासाभरातच येणके येथील राहूल कदम,विकसित गरूड,धनंजय पाटील, सागर पवार अशा शिवारात शेताकडे निघालेल्या नागरिकांना आप्पासाहेब गरूड यांच्या विहिरी जवळून गावाकडे जाणाऱ्या दुसऱ्या बिबट्याचे दर्शन झाले व पुन्हा एकच खळबळ सुरू झाली मग त्या मुलाचा बळी घेतलेला व पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या तोच आहे का ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि ग्रामस्थांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले व तो बिबट्या सुद्धा पकडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

___________________________________

येणके परिसरात गेल्या 12 वर्षापुर्वी पासून बिबट्यांचा वावर आहे.यापूर्वी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा /सात जण जखमी झाले होते.मात्र बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात वनविभागाने टाळाटाळ केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. तर आज दिसलेला बिबट्या ही मादी आहे का ? कारण कांही दिवसापूर्वी लोकांना एका बछड्याचे दर्शन झाले आहे. बिबट्या दिसला नाही तर मादी सैरभैर होऊन आक्रमक होण्याचा धोका आहे. म्हणून त्या बिबट्यालाही पकडण्याची आणि तोपर्यंत येथील पिंजरे हलविण्यात येऊ नयेत अशी मागणी ग्रामस्थामधून होत आहे.

___________________________________