पाटण तालुक्यात एल अँड टी कंपनीकडून कराड-चिपळूण रस्त्याचे झालेले काम अतिशय निकृष्ट व दर्जाहिन झाले आहे. अर्धवट कामाची बिले काढली आहेत. घाटमाथ्या पर्यंत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रेंगाळलेल्या कामामुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे. यास संबंधित एल अँड टी कंपनी सह बांधकाम विभाग जबाबदार असुन यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुका यांच्या वतीने आपण स्वतः मनसैनिकांसह सोमवार दि. १५ नोव्हेंबर पासून पाटण तहसिलदार कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा मनसेचे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी,पाटण, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार, पाटण पोलिस निरिक्षक, मुख्याधिकारी नगरपंचायत पाटण यांना देण्यात आल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, पाटण तालुक्यात एल अँड टी कंपनीने अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन काम केले आहे. महामार्गाच्या रेंगाळलेल्या अवस्थेस कंपनी व बांधकाम विभाग जबाबदार आहे. गेली तीन ते चार वर्षांपासून एल अँड टी कंपनीने रस्तयाच्या कामाच्या माध्यमातुन तालुका भकास व विकासहिन करून ठेवला आहे. या रस्त्यावरून प्रवास करतांना आजवर अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे. कामाची पुर्तता न करता बिले काढली आहेत. सबंधित कंपनी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण
तालुका यांच्यावतीने वेळोवेळी आंदोलने, उपोषण केले आहे. कागदपत्रांची वेळोवेळी पुर्तता व मागणी करून कंपनी व अधिकाऱ्यांना काम करण्यास भाग पाडले आहे. या कामामध्ये कंपनीने कोट्यावधींचा घोटाळा केला आहे. कंपनीला ४८.४१७ कि. मी. अंतरासाठी २८१ कोटी एवढी रक्कम मंजूर होती त्यापैकी कंपनीला २११.६९ कोटी रक्कम अदा करण्यात आली आहे. अजून देखील १३.१४ कि. मी. काम बाकी आहे. तसेच पुर्ण झालेल्या कामांमध्ये खुप ठिकाणी १०० ते २०० मीटरचे काम अपूर्ण आहे. केलेले काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधी २०१६-१७ ते २०१९ पर्यंत होता.
तरी संबंधित रस्त्याचा प्रश्न आपला एकट्यचा नसून सर्वांचा आहे. नागरिसुविधेसाठी तसेच लाखो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आपण आमरण उपोषणाला बसत असल्याचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी निवेदनात म्हटले आहे.