पोलीसांनी ताण-तणाव व्यवस्थापनावर लक्ष द्यावे : सारंग पाटील

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
समाजाच्या सुरक्षेसाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत असतात. मात्र चोवीस तास दक्ष असणा-या पोलीसांना शारीरिक व मानसिक ताण-तणावाला सामोरे जावे लागत असून त्यासाठी योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष व श्रीनिवास पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष सारंग पाटील यांनी केले.

    श्रीनिवास पाटील फाउंडेशन व सातारा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 'बंदोबस्त ताण-तणावाचा' याविषयी मार्गदर्शन कार्यशाळा सातारा येथील सनबीम आयटी पार्क येथे पार पडली. या कार्यशाळेसाठी सातारा पोलीस अधिक्षक कार्यालयातंर्गत महिला पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला.

    सारंग पाटील म्हणाले, महाराष्ट्र पोलीसांचा आपल्याला नेहमीच अभिमान राहिला आहे. 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या आदर्श ब्रिदवाक्याला अनुसरून सज्जनांचे रक्षण व दुर्जनांवर नियंत्रण ठेऊन त्याचा नायनाट करणे या कर्तव्यभावनेने महाराष्ट्र पोलीस सदैव कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी अहोरात्र कर्तव्य बजावले. कायदा-सुव्यवस्था राखण्यासह, गुन्ह्यांची उकल करणे, सण-उत्सवावेळी चोख बंदोबस्त ठेवणे, वाहतुकीचे नियोजन, राजकीय कार्यक्रम, व्हीआयपींचे दौरे, निवडणूका, मोर्चे, आंदोलने अशामुळे व्यस्त असणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण पडतो. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर होतो. सततच्या कामामुळे त्यांच्यावर येणाऱ्या ताण-तणावाकडे गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा असल्याने तसेच महिला पोलीस म्हणून कर्तव्य पार पाडत असताना त्या कौटुंबिक जबाबदारीही संभाळत असतात. त्या आपल्या दैनंदिन जीवनात आई, मुलगी, बहीण, बायको अशा विविध भूमिकाही निभावत असतात. कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडताना त्यावेळेस येणारा तणाव आणि वेळेचे व्यवस्थापन हे योग्यरितीने हाताळता आले पाहिजे. पोलीसांचे स्वास्थ्य चांगले असेल तर समाजाचेही स्वास्थ्य चांगले राहणार आहे.

    दरम्यान कार्यशाळेत श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व तज्ञ मार्गदर्शक सौ.रचना पाटील यांनी त्यांच्या अनेक वर्षांच्या कौशल्य विकासाच्या आलेल्या अनुभवातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. रचना पाटील यांनी मानसशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्यांना कॉर्पोरेट क्षेत्रातील 20 वर्षाचा अनुभव आहे.

याप्रसंगी साता-याच्या सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्यासह सातारा जिल्ह्यातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.