खा.शरद पवार यांनी खा.श्रीनिवास पाटील यांच्या गोटे, कराड येथील लोकसेवा जनसंपर्क कार्यालयास दिली सदिच्छा भेट.







दोन दिग्गज नेत्यांचे सच्चे मैत्री पर्व.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
    
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी खा.श्रीनिवास पाटील यांच्या गोटे, कराड येथील लोकसेवा जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. भेटीदरम्यान लोकसेवा कार्यालयातून सातारा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी सुरू असलेले कामकाज व कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त करून त्यांनी खा.श्रीनिवास पाटील व सारंग पाटील यांची प्रशंसा केली.


    खा.शरद पवार हे दोन दिवसापासून सातारा जिल्ह्याच्या दौ-यावर आले आहेत. बुधवारी सकाळी कराड येथे भेट देऊन त्यांनी प्रीतिसंगमावरील स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळास अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी गोटे, कराड येथील खा.श्रीनिवास पाटील यांच्या लोकसेवा जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी खा.शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी या कार्यालयातून चालणा-या दैनंदिन कामकाजाची सविस्तर माहिती सारंग पाटील यांच्याकडून जाणून घेतली. संपूर्ण जिल्हाभरातून दररोज येणा-या नागरिकांचे सोडविले जाणारे सामाजिक व वैयक्तिक प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी, त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यालयात राबवण्यात आलेली तांत्रिक कार्यप्रणाली, त्यातून आणलेली सुव्यवस्था व गतिमानता पाहून खा.पवार यांनी समाधान व्यक्त केले. तसेच सारंग पाटील हे नियमितपणे मतदारसंघातील गावागावात जावून प्रत्यक्ष गाव भेट देत आहेत. तेथिल स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्या सोडवणूकीसाठी ते प्रयत्नशील राहत असल्याचे ऐकून सारंग पाटील यांचे त्यांनी विशेष कोतुक केले.

    याप्रसंगी पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, सौ.रजनीदेवी पाटील, सारंग पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने उपस्थित होते. प्रारंभी खा.शरद पवार यांचे खा.पाटील व सारंग पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

___________________________________

पुन्हा मैत्री बहरली, एक सच्चे मैत्री पर्व.

  खा.शरद पवार व खा.श्रीनिवास पाटील यांच्या मैत्रीची ख्याती सर्वदूर आहे. कराड येथे बुधवारी खा.श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी दोन मित्रांच्या झालेल्या भेटीमुळे उपस्थितही भारावून गेले. गेल्या साठ वर्षाहून अधिक जपलेले हे मैत्रीचे बंध यानिमित्ताने पुन्हा बहरल्याचे दिसून आल्याने याबाबतची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती. खा.शरद पवार यांची भेट म्हणजे आमच्यासाठी आनंदी क्षण असून त्यांच्या अशा भेटीमुळे ऊर्जा मिळत असल्याचे मत खा.पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

___________________________________