महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून एकत्र आलेल्या सह्यपुत्रांनी, हरीहर गडावर साजरा केला 'राष्ट्रीय एकता दिवस'!

 


  किन्हवली|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

      सह्याद्रीच्या सुपुत्रांना एकत्र करून दुर्गभ्रमंती, व्याख्यान आणि दुर्गसंवर्धन करण्यासाठी महाराष्ट्रातील, अगदी कमी अवधी मध्ये ट्रेकर्स मंडळींच्या पसंतीस उतरलेले ' सह्यपुत्र परिवार' ने दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी, राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने; नाशिक जिल्ह्यातील गोंडा घाटातील प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या 'हरीहर' गडावर अभ्यास मोहीम आयोजित केली होती. ३० ऑक्टोबर पासुन रात्रीचा प्रवास करत पहाटे हरीहर गडाच्या पायथ्याशी सर्व मंडळी गोळा झाली. या मोहिमेत मुंबई, शहापुर,मुरबाड,नगर, पुणे, कराड, बारामती आदी ठिकाणाहून सह्यपुत्र सहभागी झाले होते. दोन तासांचा ट्रेक करत सगळ्यांनी हरीहर गडाच्या आकर्षण असणाऱ्या, आस्मानाला गवसणी घालणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा थरारक अनुभव घेतला आणि पुढे गडावर असणाऱ्या तलावाच्या किनाऱ्यावर पुन्हा एकदा एकत्र बसले. तिथे सर्वांचा परिचय आणि अनुभव घेण्यात आला तसेच उपस्थितांच्या पैकी व्याख्याता आणि गायिका जागृती धलपे यांनी गणपती बाप्पाचे गीत म्हंटले तर 'सह्यपुत्र परिवाराचे' सदस्य व्याख्याते,लेखक प्रा. नवनीत यशवंतराव यांनी हरिहर गडाचा इतिहास गडप्रेमिंच्या समोर ठेवतांना त्यांनी भौगोलिक, वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील किल्ल्याचे महत्व पटवून देताना ते म्हणाले की सरकार किल्ल्यांची कामे करेल की नाही यावर आपला विश्वास नाही परंतु आपण सह्याद्रीचे सुपुत्र म्हणुन आपण या सह्याद्रीचे काहीतरी देणे लागतो या भावनेने आपापल्याला जबाबदारी ओळखुन कार्य करणे गरजेचे आहे असे विचार त्यांनी मांडले. व्याख्यान सुरू असताना ' उत्तुंग ट्रेकर्स ' समुह देखील या व्याख्यानाचे श्रवण करण्यासाठी सहभागी झाले. गडसंवर्धनाचे महत्व आणि गरज यावर यावेळी चर्चा करण्यात आली. या कार्यक्रम साठी विविध ठिकाणाहून आलेले सव्वाशे सह्यपुत्र उपस्थित होते. गड दर्शन झाल्या नंतर प्रशांत केदारी यांनी पुढाकार घेऊन स्वतः गडावरील प्लॅस्टिक आपल्या सोबत घेत घेत इतर मंडळींनी सुद्धा गड स्वच्छता करत परतीच्या प्रवास सुरु केला;पुन्हा एकदा नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून प्रत्येक जण पायथ्याच्या हर्षेवाडी येथे विसावला. दुपारचे जेवण केल्यावर निरोप समारंभ झाला आणि सर्व सह्यपुत्र आपापल्या गाडीत बसुन गाड्या त्यांच्या मार्गाला लागल्या. या मोहिमेचे मुख्य नियोजन ' सह्यपुत्र' परिवाराचे सदस्य अंकिता शिंदे, नितेश भेरे , प्रणित भेरे , अनिकेत शेलार यांनी केले होते.तर स्वयंसेवक म्हणुन विशाल भेरे, रोहित देसाई, विश्वास ठाकरे, सचिन पाटील, अथर्व भोसले आनंद भेरे यांनी काम पाहिले. आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सह्यपुत्र परिवाराने सांगितले की हरिहर गड सारख्या महत्वाच्या किल्ल्याकडे येण्यासाठी अतिशय खराब रस्त्याने यावे लागत आहे. स्थानिक लोप्रतिनिधींनी या कडे लक्ष द्यावे अशी विनंती करुन पुढे त्यांनी सांगितले की, येणाऱ्या रविवारी दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी, सकाळी ७ वाजता किल्ले रायगड येथे, दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन सह्यपुत्र परिवाराने केले आहे. आपणा सर्वांना या दीपोत्सवाचे आवातन! अधिक माहितीसाठी संपर्क क्र. ८४५९००२८२८ या वर फोन करावे असेही आवाहन त्यांनी केले आहे