पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे हे आगळ्यावेगळ्या कलाविष्कारासाठी प्रसिध्द आहेत. वह्याच्या माध्यमातून गृह (ग्रामीण), वित, नियोजन राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन महाराष्ट्र राज्य मंत्री ना. शंभूराज देसाई यांची प्रतिमा साकारली आहे.
ना.शंभूराज देसाई वाढदिवस आणि डाॅ.संदीप डाकवे यांची वेगळी कलाकृती हे आता एक समीकरणच झाले आहे. यापूर्वी त्यांनी ठिपके, अक्षरगणेशा, रेखाचित्र, रांगोळी या माध्यमातील कलाकृती भेट देवून ना.देसाई यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गतवर्षी 54 चित्रे रेखाटून त्याची फ्रेम गृहराज्यमंत्री यांना देण्यात आली. त्याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ या पुस्तकात झाली आहे. त्यांच्या या सर्व कलाकृतींची दखल ना.देसाई यांनी घेवून डाॅ.डाकवे यांचे कौतुक केले आहे.
यावर्षी देखील काहीतरी वेगळी कलात्मक भेट द्यावी असा विचार करत असताना त्यांनी 72 वह्याच्या माध्यमातून शंभूराज यांची अप्रतिम छबी साकारली आहे. या प्रतिमेच्या तयारीसाठी त्यांना सुमारे 4 ते 5 दिवसाचा कालावधी लागला. सुरुवातीला अतिशय विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक रेखाचित्र डाॅ.डाकवे यांनी तयार केले. त्यानंतर वहीच्या आकारावर त्यांनी प्रत्येक भाग काळजीपूर्वक चिटकवला. त्या सर्व वह्यात एकत्र जोडल्यानंतर ना. शंभूराज देसाई यांची सुंदर अशी छबी तयार होत आहे. ही छबी पाहताक्षणीच लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्राचे आणि डाॅ.संदीप डाकवे यांच्या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही प्रतिमा मोठी आहे. ही प्रतिमा भेट देताना व ती हाताळताना त्रास होवू शकतो म्हणून डाॅ.डाकवे यांनी या प्रतिमेचा फोटो काढून त्याची फ्रेम ना.देसाई यांना देण्यात येणार आहे.
________________________________
कार्यक्रमात स्वागत करण्यासाठी किंवा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी इतर भेटवस्तू न आणता वह्या स्वीकारण्याची पध्दत गेली काही वर्षे ना. शंभूराज देसाई यांनी स्वीकारली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांना अनोखी भेट आणि वह्या देता येतील म्हणून वाह्यामधून ना. शंभूराज देसाई यांची प्रतिमा साकारली असल्याचे मत कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले आहे.
________________________________