जन सहकार निधी लिमिटेडच्या वतीने सभासदांना वाहन वितरण

 तळमावले येथील जन सहकार निधी लिमिटेडच्या वतीने सभासदांना वाहन वितरण करताना संस्थेचे चेअरमन मारुतीराव मोळावडे, संचालक प्रशांत पोतदार व इतर मान्यवर.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

स्वच्छ व पारदर्शी कारभारांने सभासद आणि ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या जन सहकार निधी लिमिटेड या संस्थेने अल्पावधीत सभासदांचा विश्वास संपादन केला व जनसामान्यात व सहकारात आपले वेगळे स्थान निर्माण केले. सभासद,ठेवीदार, संचालक आणि कर्मचाऱ्यांच्या सामुहिक विश्वासाचे हे यश आहे असे प्रतिपादन पतसंस्थेचे चेअरमन मारुतीराव मोळावडे यांनी केले.       

   जन सहकार निधी लिमिटेड तळमावले या पतसंस्थेच्या वतीने दोन सभासदांना दुचाकी व चारचाकी  वाहनांचे वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 

संस्थेचे सभासद हिरोजी तुपे यांना MARUTI SUZUKI ERTIGA या चार चाकी वाहनांचे वितरण संस्थेचे संचालक प्रशांत पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले. याच वेळी सभासद विवेक मोळावडे यांनाही HERO SPLENDOR या दुचाकी वाहनाचे वितरण संस्थेचे सल्लागार उमेश काळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन मारुतीराव मोळावडे, संचालक अमोल मोरे, सचिन ताईगडे, आनंदा माने, मिलिंद ताईगडे, सल्लागार जयंवत दिंडे, सुनील पांढरपट्टे तळमावले येथील व्यापारी वर्ग व मान्यवर उपस्थित होते.

संस्थेच्या प्रगतीबाबत बोलताना चेअरमन मारुतीराव मोळावडे म्हणाले जन सहकारने सर्वसामान्य जनता व व्यापारी वर्गाला केंद्रबिंदू मानून कारभार केला. यामुळे लोकांचा संस्थेवर विश्वास वाढत चालला आहे. ही संस्था सर्वसामान्य जनतेच्या विश्वासास पात्र ठरली आहे.