काँग्रेसला न 'भावलेले' मधुकर भावे

पत्रकाराने एखादी विशिष्ट विचारसरणी फॉलो करावी किंवा नाही,हा हल्ली खूपच चर्चेचा विषय झाला आहे.महाराष्ट्राच्या पत्र इतिहासात अशी अनेक उदाहरणे सापडतील की, ज्यांनी विचारसरणीचा पाठपुरावा केला,चळवळीत सक्रिय सहभाग घेतला,यशस्वीही करुन दाखवला.अगदी लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर,प्र.के.अत्रे यांच्या पासून अलीकडच्या संजय राऊत यांच्या पर्यंत अनेक उदाहरणे सांगता येतील.या सर्वांत एक साम्य म्हणजे,ते फक्त 'लिहते ' नव्हते तर ' कर्ते ' सुद्धा होते.आणि त्यांच्या या कर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्राच्या राजकारण,समाजकारणावर उमटलेला दिसून येतो.पण प्रदीर्घ अनुभव,व्यासंग आणि महाराष्ट्राच्या स्थापने पासून प्रत्येक ऐतिहासीक प्रसंगाचा साक्षीदार असलेला, एक निरपेक्ष अवलिया मात्र महाराष्ट्राच्या कौतुकापासून थोडासा दूरच राहिला.अगदी निरपेक्ष भावनेनं.त्यांना त्याची खंत आहे ना खेद. 'करमण्ये वाधिकारस्ये ' या तत्त्वाने ते चालत राहिलेत,अजूनही चालाताहेत. वयाची ८२ वर्षे पार केलेल्या या सळसळत्या रक्ताच्या चैतन्यमूर्तीचं कौतुक महाराष्ट्रानं फारसं केलं नाही,याची खंत माझ्या सारख्या त्यांच्या चाहत्यांना जाणवल्या शिवाय राहत नाही,हे खरं.मी हे लिहीतोय ते वंदनीय मधुकर भावे यांच्या विषयी...

 मधुकर भावे हे मूलतत्ववादी विचारांना प्रखर विरोध करणारे,आपल्या लेखणी आणि वाणीतून जनजागरण घडवून आणणारे महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक,विचारवंत, राजकीय विश्लेषक.महाराष्ट्रचा चालता बोलता राजकीय,सामाजिक इतिहास त्यांना मुखोदगत् आहे. तर भूगोल तळहातासारखा माहीत आहे. ज्यांनी आयुष्यभर काँग्रेस विचारधारा जपली,ज्यांना काँग्रेस कळली पण काँग्रेसला ते उमगले नाहीत... असे मधुकर भावे.

आज ९ ऑक्टोंबर त्यांचा प्रकटदिन,आज ते ८३ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.त्यांनी शतकवीर व्हावे हिच साईबाबांच्या चरणी प्रार्थना...

काँग्रेस हा पक्ष नसून ती एक विचारधारा आहे.सर्वधर्म समभाव,ग्रामीण जीवनातील बदल व सामान्य माणसाची प्रगती या विचारधारेतूनच होवू शकते,याचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्राच्या तळागाळात गेल्या पन्नास वर्षांपासून मधुकर भावे करत आले आहेत. लोकमत वृत्तपत्र समूहात संपादक असताना तर त्यांनी अनेक अग्रलेख व लेखातून काँग्रेसचे विचार वाडी-वस्तीपर्यंत पोहचवले.महाराष्ट्राच्या निर्मिती पासून आत्तापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांशी (एखादा अपवाद वगळता) त्यांचे सलोख्याचे संबंध राहिलेत.राज्याच्या विकासाच्या निर्णयात भावे साहेबांचे मत महत्त्वपूर्ण मानले जाते.पक्षवाढीसाठी त्यांचा सल्ला मोलाचा ठरतो.पण अलीकडच्या काळात यात बदल झालेला जाणवतो.व्यापक विचारांच्या या पक्षात संकुचित विचारांचे लोक निर्णय प्रक्रियेत सामील झाल्यामुळे हा बदल दिसत असावा.काँग्रेसला राज्यात व केंद्रात उतरती कळा लागलीय. पक्षांतर्गत गटबाजीला उधाण आलंय.त्यामुळं कोणी कोणाचे नेतृत्व मानायला तयार नाही.कार्यकर्ता हे पद गोठवून सर्वजण स्वयंघोषीत नेते बनलेत.या बजबजपुरीमुळे व ज्याच्याकडे पाहून राज्यात काँग्रेस एकसंघ होईल - राहील,असा एकही आशावादी चेहरा काँग्रेसकडे राहिला नाही.त्यामुळे राज्यात काँग्रेस दुबळी होत चाललीय.राज्यात काँग्रेस सत्तेत सहभागी आहे,पण पक्ष वाढीचे काय?मंत्रीपदाची फळे चाखणारानी 'ग्रास रूट'ला जावून पहावे,म्हणजे पक्ष कुठे आहे ते कळेल.सत्तेत वाटा घेणाऱ्या काँग्रेसला पक्षवाढीसाठी 'हातात ' वाडगा मिळालाय,हे वास्तव नाकारून चालणार नाही.पक्ष पडझडीच्या काळात काही नव्या व नवख्या चेहऱ्यानां संधी द्यायला हवी.त्या सोबत भावेंसारख्या अभ्यास आणि अनुभव या दोन्ही पातळीवर प्रगल्भ असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीला सन्मानपूर्वक पद देवून दोन्हींची सांगड घातली तर पक्ष वाढ होवू शकते.काँग्रेस मधील जुन्या जाणत्या नेत्यांनी यात लक्ष घालण्याची गरज आणि वेळ निर्माण झालीय.पक्ष वाढीसाठी कोण कधी उपयुक्त आहे, हे ओळखणारे काँग्रेसकडे कोणीच राहिले नाही,त्यामुळे ही वेळ आली आहे,असेच म्हणावे लागेल.सध्या राज्यपालांकडे आमदार निवडीचा विषय प्रलंबित आहे.या निवडीत राजकीय व्यक्तींचा समावेश न करता विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्यांना संधी मिळावी,असा राज्यपालांचा आग्रह आहे. या निकषात भावेसाहेब बसतात.मग काँगेसने त्यांची शिफारस केली ? का केली नाही...

 अव्याहतपणे काँग्रेस विचारधारेशी वाहून घेतलेल्या भावे साहेबांचा पक्षवाढी करिता उपयोग होऊ शकतो.जुन्या जाणत्याबरोबर तरुणांनाही भावे साहेबांचे विचार भावतात,कारण ते वास्तव असतात.म्हणूनच त्यांच्या भाषणाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.कितीतरी वर्षा पूर्वीच्या आठवणी त्या अगदी काल परवा घडल्या प्रमाणे सांगत असतात त्यांच्या या ,' पिन पॉइंट मेमरीचं ' आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. त्यांची भाषणं ऐकण म्हणजे एक प्रकारची मेजवानीच असते.काँग्रेसचे अनेक आयाराम - गयाराम त्यांनी बघितलेत. गांधी विचार हा त्यांचा ध्यास आणि श्वास.काँग्रेसचे ते सच्चेपाईक. मात्र हल्ली सर्वच राजकीय पक्षात गुणीजनांची, स्पष्टवक्त्यांची कदर करण्याची संस्कृती (?) राहिलेली नाही.आता फक्त हुजरेगिरीचीच चलती आहे. भावे साहेबांना ती कधी जमली नाही.

   भावे साहेबांचा उतरत्या वयात ही उत्साह,तळमळ कमी झालेली नाही.कुठून येत असेल ही एनर्जी? शरीर हृदयावर चालतं हा वैद्यकशास्त्राचा नियम आहे.भावे साहेबांचे हृदयच काँग्रेसमय आहे.काँग्रेसच्या सर्व गट-तटांना एकत्र आणण्याचे काम,संकट मोचक म्हणून फक्त भावे साहेबच करु शकतात.अधिकार वाणीने काँग्रेस जणांना एकत्र करणारा भावे साहेबांन शिवाय दुसरा एकही सक्षम पर्याय दिसत नाही.असे असताना काँग्रेससाठी आयुष्य वेचलेल्या भावे साहेबांच्या कामाचं काँग्रेस चीज करेल का हाच खरा प्रश्न आहे...

भावे साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा .....!

शब्दांकन : जगदीश पाटील,कराड