ट्रेकर सुहास पाटील यांचे ट्रेकींगवेळी दुर्देवी निधन.

शहरावर शोककळा : ट्रेकर, सायकीलीस्ट व व्यापारी वर्गातून हळहळ

कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

     घारेवाडी ता. कराड येथील धुळोबा डोंगरात ट्रेकींग करताना शहरातील प्रसिद्ध गुळाचे अडत व्यापारी, तसेच ट्रेकर व सायकीलीस्ट सुहास शामराव पाटील (वय ५२) याचा ट्रेकिंगदरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. रविवारी १७ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ट्रेकिंग करताना ह्रदयाचा तीव्र धक्का बसला. त्यानंतर पाटील यांना त्यांच्यासोबत व इतर ट्रेकर्सनी उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने शहरासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. 

     धुळोबा डोंगरावर रविवारी सकाळी ट्रेकींगसाठी जाताना ट्रेकर सुहास पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घारेवाडीतील मंदीराजवळ वाहने लावली. त्यानंतर धुळोबाचा डोगर सर करत असताना ट्रेकर सुहास पाटील यांना ह्रदयविकाराचा तीव्र धक्का बसला. या धक्याने ते खाली कोसळले. तसेच त्यांच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव झाला. ही घटना लक्षात येताच त्यांच्यासोबत असलेल्या अन्य ट्रेकर्सनी शहरातून अन्य ट्रेकर्सना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर कसलाही विलंब न लावता तब्बल ४० हून अधिक ट्रेकर्सनी धुळोबाच्या डोंगराकडे धाव घेतली.


      त्यानंतर डोंगरावर निपचित पडलेल्या सुहास पाटील यांना सर्व ट्रेकर्सनी शिडीच्या सहाय्याने डोंगर पायथ्याची आणले. तसेच तात्काळ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी मलकापूर (कराड) येथील कृष्णा रूग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच सुहास पाटील यांचा मृत्यू झाला होता. ही बाब त्याठिकाणी उपस्थित असलेल्या त्यांच्या सर्व सहकारी ट्रेकर्सना समजल्यानंतर त्यांना मोठा धक्काच बसला. त्याचबरोबर याबाबतची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली.

    दरम्यान, या दुर्दैवी घटनेबाबत शहरातील ट्रेकर, सायकीलीस्ट व व्यापारी वर्गातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.