आनंदराव चव्हाण पतसंस्था 100 कोटी ठेवींचा टप्पा पार करणार : चेअरमन अभिजीत पाटील.

वार्षिक सभेत केला सभासदांसाठी लाभांश जाहीर तर गुणी विद्यार्थ्यांचा गौरव .


आनंदराव चव्हाण सह.पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलतांना चेअरमन अभिजित पाटील सोबत संस्थापक हिंदुराव पाटील, जोगेश्वरी महिला पतसंस्थेच्या चेअरमन मंदाकिनी पाटील व संचालक.

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
आनंदराव चव्हाण पतसंस्थेने पारदर्शी कारभार आणि बँकींग प्रणालीचे नवनवीन उपक्रम राबवून सभासदांसह जनतेला चांगली सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न करून सहकारी पतसंस्थांच्या क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोरोना महामारीच्या संकटातही गेल्या दोन वर्षात संस्थेने सभासद व ठेवीदारांना सेवा सुविधा पुरवून विश्वास संपादन केला आहे,सभासदांच्या विश्वासावर येत्या 2025 पर्यंत संस्था 100 कोटी ठेवींचा टप्पा पार करेल असा विश्वास संस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला.

                आनंदराव चव्हाण पतसंस्थेची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि जोगेश्वरी महिला पतसंस्थेची 16 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात कोरोना नियमांचे पालन करून संपन्न झाली.त्यावेळी ते सभासदांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. संस्थेचे संस्थापक हिंदुराव पाटील,व्हा.चेअरमन आर.बी पाटील, जोगेश्वरी महिला सह.पतसंस्थेच्या चेअरमन मंदाकिनी पाटील व्हा.चेअरमन शकुंतला कदम व सर्व संचालिका उपस्थित होत्या.  

                        यावेळी संस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले संस्थेच्या सर्व शाखा संगणीकृत असून संस्थेचे कामकाज कोअर बँकिंग पद्धतीने सुरू आहे.संस्थेच्या प्रगतीत संचालक,सल्लागार,ठेवीदार व कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे.संस्थेचे संस्थापक हिंदुराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरु आहे. संस्थेने या वर्षी सभासदांना पाच टक्के लाभांश जाहीर केला आहे.  

         यावेळी संस्थापक हिंदुराव पाटील म्हणाले अडचणीच्या काळात स्थापना झालेल्या या संस्थेने कोरोनाच्या काळात अर्थकारणाला फटका बसला असला तरी चांगले काम केले आहे.तसेच जोगेश्वरी महिला पतसंस्थेने चांगले काम करून महिलांची आर्थिक उन्नती केली आहे.

       यावेळी महिला पतसंस्थेच्या चेअरमन मंदाकिनी पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. शिष्यवृत्ती परीक्षेत प्राधान्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र संस्थेचे स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले तसेच सातारा जिल्हा नियोजन समितीवर संस्थेचे संस्थापक व काँग्रेसचे प्रांतीक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांची निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला.    

यावेळी आनंदराव चव्हाण पतसंस्थेचा वार्षिक अहवाल संस्थेचे व्यवस्थापक सुहासचंद्र पाटील यांनी वाचून दाखवला तर जोगेश्वरी महिला पतसंस्थेचा अहवाल संस्थेचे व्यवस्थापक दादासाहेब साळुंखे यांनी वाचून दाखवला प्रास्ताविक व स्वागत संजय लोहार यांनी केले तर संस्थेचे व्हाईस चेअरमन आर. बी. पाटील यांनी आभार मानले.