काळगांव ता.पाटण येथील काळेमळा वस्तीला पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.याबाबत तिथल्या ग्रामस्थांनी तक्रारी, विनंती व मागणी करूनही ग्रामपंचायत कडून सुरळीतपणे पाणीपुरवठा होत नसल्याचे कारणामुळे तिथल्या संतप्त ग्रामस्थांनी काळगाव गावातील मुख्यरस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने कांही काळ वाहतूक बंद पडली होती.
याबाबत तिथल्या ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार काळगांवच्या न्यु इंग्लिश स्कुलजवळ काळेमळा नावाची वसाहत आहे. तिथे ग्रामपंचायती मार्फत नळपाणी पुरवठा केला आहे.मात्र पाणी पुर्णदाबाने व पुरेशा प्रमाणात मिळत नाही. ही तक्रार गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे.
याबाबत तिथल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत मात्र तिकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाहीअशीही तक्रार आहे पाणीपुरवठा सुरळीत व पुरेशा प्रमाणात होत नाही त्यामुळे या वसाहतीतील लोकांना भटकंती करून खाजगी मालकीच्या विहिरीवरून पाणी मिळवावे लागत आहे.तर पिण्यासाठी ही पंचायतीच्या वाटर ए.टी.एम.वर जाऊन तिथून पाणी आणावे लागते.
अनेक वर्षांपासून वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही म्हटल्यावर संतप्त झालेल्या तिथल्या ग्रामस्थांनी गावात जाणारा मुख्य रस्ता बंद करून रास्ता रोको करून वाहतूक बंद पाडली. तेंव्हा ग्रामपंचायतीचे उपसरपंच वसंतराव देसाई, ग्रा.प.सदस्य शिवाजी पवार यांनी घटनास्थळी जाऊन तिथल्या लोकांशी संपर्क साधला व चर्चा करून सर्व प्रकारे प्रयत्न करून आठवडा भरात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले तेंव्हा ग्रामस्थांनी अडथळे बाजूला करून रस्ता वाहतुकीस खुला केला.